शेख हसीना यांना १० वर्षांचा तुरुंगवास

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ढाका येथील एका विशेष न्यायालयाने ‘पूर्बाचल प्लॉट घोटाळा’ प्रकरणात शेख हसीना यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

विशेष म्हणजे, या घोटाळ्यात केवळ हसीनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही दणका बसला असून, त्यांची भाची आणि ब्रिटिश खासदार ट्यूलिप सिद्दीक यांना ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

हा संपूर्ण खटला पूर्बाचल न्यू टाउन प्रोजेक्टमधील भूखंड वाटपाशी संबंधित आहे. भ्रष्टाचारविरोधी आयोगाने आरोप केला होता की, शेख हसीना यांनी सत्तेचा गैरवापर करत आणि सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून नियमांना हरताळ फासला. या प्रकल्पातील सेक्टर २७ मधील ‘डिप्लोमॅटिक झोन’मध्ये स्वतःसाठी आणि आपल्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी १० कट्ठाचे ६ भूखंड बेकायदेशीरपणे लाटले होते. विशेष म्हणजे, हे सर्व सदस्य या भूखंडांसाठी पात्र नसतानाही त्यांना हे वाटप करण्यात आले होते.

Happy journey marathi

कुटुंबासह अधिकाऱ्यांवरही गाजली कुऱ्हाड

न्यायाधीश मोहम्मद रबीउल आलम यांनी या प्रकरणात केवळ हसीना यांनाच नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला दोषी धरले आहे. हसीना यांची दुसरी भाची अजमीना सिद्दीक आणि पुतण्या राडवान मुजीब सिद्दीक बॉबी यांनाही ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच १ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे.

या घोटाळ्यात केवळ राजकीय नेतेच नाही, तर तत्कालीन बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. न्यायालयाने माजी गृहनिर्माण मंत्री शरीफ अहमद, माजी सचिव आणि राजुकच्या अनेक माजी अध्यक्षांसह एकूण ११ जणांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

जलदगतीने चालला खटला

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अवघ्या १५ सुनावणींमध्ये हा खटला पूर्ण करण्यात आला. यामध्ये ३९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, ज्यात भ्रष्टाचारविरोधी आयोगाचे अधिकारी आणि गृहनिर्माण मंत्रालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

शेख हसीना यांच्यासाठी हा पहिलाच धक्का नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही त्यांना भ्रष्टाचाराच्या चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण २६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता या नवीन निकालामुळे हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या राजकीय भविष्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 02-02-2026