रत्नागिरीच्या ‘धोंड’ नाटकाचा कोल्हापूर केंद्रावर गौरव

रत्नागिरी : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीच्या ‘धोंड’ या नाटकाने आपल्या दर्जेदार सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकत दोन महत्त्वपूर्ण पारितोषिकांना गवसणी घातली आहे.

या स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी विदुला जितेंद्र मुळ्ये ही तिच्या कसदार अभिनयासाठी ‘उत्कृष्ट अभिनय रौप्य पदकाची’ मानकरी ठरली. तसेच, नाटकाला लाभलेल्या प्रभावी पार्श्वसंगीतासाठी माजी विद्यार्थी हर्ष नागवेकर याला ‘संगीत दिग्दर्शनासाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. लेखक योगेश कदम यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाला शहबाज गोलंदाज यांनी दिग्दर्शित केले. नाटकाची निर्मिती जानकी घाटविलकर (मुख्याध्यापिका) यांनी केली असून, वेषभूषा गायत्री मांगले यांचा होती. यात त्यांना श्रद्धा शेट्ये यांचे साह्य लाभले. रंगभूषा नरेश पांचाळ, सागर सकपाळ यांची, तर प्रकाश योजना साई शिरसेकर आणि अजिंक्य केसरकर यांची होती. नेपथ्य निरंजन दीपक सागवेकर यांनी केले. त्यांना सुभाष भोंबल यांचे साह्य लाभले. पार्श्वसंगीत हर्ष नागवेकर यांचे असून, त्यांना जयेश गुरव यांचे साह्य लाभले.

रंगमंचावर विदुला मुळ्ये (आजी), विभा कडव (श्रेया), शांभवी रेमणे (स्वरा), रमा कानविंदे (ईशा), समृद्धी सावंत (श्रवणची ताई), त्वीशा भाटकर (गण्याची आई), हृषिकेश मोंडकर (आजोबा), शौर्य मयेकर (नील), दत्तात्रय नार्वेकर (श्रवण) आणि समर्थ कोळी (गण्या) हे बालकलाकार सहभागी झाले होते. हे बालनाट्य यशस्वी होण्यासाठी पालक प्रतिनिधी दीप्ती कानविंदे, कार्यवाह धनेश रायकर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, सुनील तथा दादा वणजू, श्रीकृष्ण दळी आणि विनायक हातखंबकर यांनी मोलाची कामगिरी बजावली व कलाकारांना मार्गदर्शन केले.

कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लब येथे ५ ते १४ जानेवारी या काळात झालेल्या या स्पर्धेत एकूण ४९ प्रयोगांनी सहभाग नोंदवला होता. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी विजेत्या कलाकारांचे व पटवर्धन हायस्कूलचे विशेष अभिनंदन केले आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक जानकी घाटविलकर, उप मुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, कल्पना शिरोळकर, वर्षा जोशी तसेच सर्व पालक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 04/Feb/2026