रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचंय, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील : अमोल मिटकरी

Jun 14, 2024 - 11:15
Jun 14, 2024 - 12:00
 0
रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचंय, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील : अमोल मिटकरी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकता आली.

यानंतर अजित पवार गटातील काही नेते आणि आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली असून, त्या आता खासदार झाल्या आहेत. यातच रोहित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण जयंत पाटीलच करेक्ट कार्यक्रम करतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. जयंत पाटील यांचा पक्ष उभारण्यामागे वाटा आहे. हा नव्याने आलेला नवखा युवक पहिल्यांदा आमदार झाला. लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार आणि जयंत पाटील यांचे मोठे योगदान आहे. जयंत पाटील हे पक्षाचा पिलर आहेत. रोहित पवार आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे आहेत, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असल्याने आधी अजित पवार आणि आता जयंत पाटील यांना बाजूला सारण्याचे काम करत आहेत, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र सोडले.

जयंत पाटील याचा टप्प्यात कार्यक्रम वाजवणार

अजित पवार असतानाही असाच प्रयत्न सुरू होता. अजित पवार यांनी वेगळे काही मागितले नाही. पक्षाची जबाबदारी मागितली होती. रोहित पवारांना अजित पवार यांची जागा घ्यायची होती. जयंत पाटील आता त्यामध्ये अडसर ठरत असल्याने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. रोहित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. म्हणून आता जयंत पाटील यांचा अपमान करायचा आहे. जयंत पाटील यांचा टप्प्यात कार्यक्रम वाजवणार, असे अमोल मिटकरी म्हणाले.

दरम्यान, रोहित पवारांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे. रोहित पवार आता वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना आता काही कामधंदा राहिला नाही. विधानसभा तोंडावर आली असल्याने बालिश चाळे सुरू आहेत. उगाच हिरोगिरी करायची कामे सुरू आहेत, अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली. तसेच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवल्यामुळे छगन भुजबळ नाराज झालेले नाहीत. हा निर्णय सर्वानुमते झाला असून, छगन भुजबळांची त्याला मान्यता मिळाली. ते नाराज असते तर त्यांनी सांगितले असते, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow