चिपळूणचे सरपंच २४ जूनला मंत्रालयावर धडकणार

Jun 18, 2024 - 14:52
 0
चिपळूणचे सरपंच २४ जूनला मंत्रालयावर धडकणार

चिपळूण : सरपंचांसह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यांबाबत तालुक्यातील सर्व १३० ग्रामपंचायतीचे सरपंच २४ जूनला मंत्रालयावर धडक देणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी सरपंच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्र्याशी चर्चा होण्यासाठी सरपंच संघटनेने पालकमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांची भेट घेत निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.

सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यासाठी गतवर्षी १८ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील सरपंचानी आंदोलन केले होते. त्यानंतर शासनाकडून सरपंचांच्या मागण्यांवर पुरेशी कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या मागण्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्धार चिपळूण तालुका सरपंच संघटनेने बैठकीत केला. त्यानुसार मुख्यमंत्र्याची वेळ मिळावी, त्यांच्याशी चर्चा व्हावी यासाठी सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, मालघरचे सरपंच सुनील वाजे यांनी पालकमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. सरपंच संघटनेची मुख्यमंत्र्याशी चर्चा घडवून आणावी, त्याचवेळी पालकमंत्री व दोन्ही आमदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही सरपंच संघटनेने केले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी १००हून अधिक सरपंच या मोहिमेत सहभागी होणार असल्याचे सरपंच संघटनेकडून सांगण्यात आले.

सरपंच मानधन, सदस्य भत्ता आणि मानधन, उपसरपंच मानधनात भरीव वाढ करावी, आमदार, खासदारांप्रमाणे सरपंचांना विकासकामांसाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून द्यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, जिल्हा परिषदेत सरपंचांसाठी स्वतंत्र कक्ष असावा, मुंबईत निवासव्यवस्था, विकासकामांबाबत शहराप्रमाणेच ग्रामीण भागासाठी निकष असावेत, आदी विविध मागण्या प्रलंबित आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:20 18-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow