तलाठी परीक्षा उत्तीर्ण, पण अद्याप नियुक्ती नाही

Jun 19, 2024 - 13:44
 0
तलाठी परीक्षा उत्तीर्ण, पण अद्याप नियुक्ती नाही

मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोलीस भरती (Police Bharti) चालू झाली आहे. आजपासून या जिल्ह्यांत मैदानी चाचण्या घेतल्या जातायत. सरकारी नोकर होण्याची नामी संधी हीच आहे, असे समजून या चाचणी परीक्षात लाखो पीरक्षार्थीनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पोलीस विभागात वेगवेगळ्या पदांसाठी चालू असलेल्या या भरती प्रक्रियेत तरुण उत्साहाने सहभागी होत आहेत. मात्र एकीकडे पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असताना दुसरीकडे तलाठी (Talathi) पदासाठी निवड झालेल्या मात्र अद्याप नियुक्ती न मिळालेल्या यशस्वी परीक्षार्थींचा मुद्दा समोर आला आहे. या यशस्वी परीक्षार्थीची अद्याप तलाठी म्हणून नेमणूक झालेली नाही. त्यामुळे सरकारला ग्रामीण भागातील प्रशासनाची चिंता नाही का? असे विचारले जात आहे.

3 हजार 749 तरुण तरुणींना अद्याप नेमणूक नाही

राज्य सरकारने तलाठी पदासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात स्पर्धा परीक्षा घेतली. जानेवारी महिन्यात त्याचा निकालही लागला. या निकालानंतर 4 हजार 744 यशस्वी परीक्षार्थींचे प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्र व तपशिलांची पडताळणीही झाली. मात्र अजूनही तलाठी पदासाठी निवड झालेल्या राज्यातील सुमारे 3 हजार 749 तरुण तरुणींना नेमणूक दिली जात नाहीये. ग्रामीण भागात तलाठी हे पद फार महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची बहुसंख्य कामे ही तलाठ्याकडेच असतात. मात्र अद्याप हजारो यशस्वी परीक्षार्थींना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शासनाचं काम बळकट करण्यात राज्य सरकार इच्छुक नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फडणवीसांची घेतली भेट, पण अद्याप निर्णय नाही

निवड होऊनही नेमणुकीच्या प्रतीक्षेत असलेले तलाठी गेले अनेक महिने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. वेगवेगळे कारण सांगून संबंधित जिल्हा प्रशासन या तलाठ्यांना नेमणूक पत्र देत नाहीये. नुकतेच या तलाठ्यांच्या एका शिष्टमंडळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेटही घेतली होती. मात्र अद्याप या यशस्वी परीक्षार्थिंना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आता या यशस्वी परीक्षार्थींकडून संताप व्यक्त केला जात आहे. सरकार यांना सेवेत कधी सामावून घेणार असा प्रश्न विचारला जातोय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow