लांजा : महामार्गावरील रखडलेल्या कामांसाठी आठ दिवसांची मुदत

Jun 20, 2024 - 12:06
 0
लांजा : महामार्गावरील रखडलेल्या कामांसाठी आठ दिवसांची मुदत

लांजा : येथे शहरात रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील गटार, सर्व्हिस रोड आणि पाईपलाईनच्या कामावरून लांजावासीयांनी ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले, पुढील आठ दिवसांत ही कामे मार्गी लावण्याची डेडलाईन दिली आहे.

लांजा येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीला लांजा तहसीलदार प्रमोद कदम, महामार्ग विभागाचे उपअभियंता आर. पी. कुलकर्णी, कन्सलटिंग ऑफिसर प्रशांत पाटील, ईगल इन्फ्राचे नरेश शितलानी, नानेजा जयंतीलाल, लांजा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे, नगराध्यक्ष मनोहर बाईत आदी उपस्थित होते. लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून सध्या पावसाळ्यात सुरू असलेल्या कामांमुळे लांजावासीयांना चिखलातून पायपीट करावी लागते. अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही बैठक झाली. सुरुवातीलाच लांजा शहरातील रखडलेल्या पाईपलाईन, गटाराचे काम आणि सर्व्हिस रोड यावरून उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. राष्ट्रवादीचे अभिजित राजेशिर्के तसेच बाबा लांजेकर, नगरसेवक मंगेश लांजेकर, नगरसेवक सचिन डोंगरकर, अनंत आयरे, व्यापारी कुमार बेंडखळे, संजय यादव, प्रकाश लांबेकर आदींनी प्रश्नाची सरबत्ती केली. 

रखडलेल्या सर्व्हिस रोडच्या कामामुळे नागरिकांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्याची गरज वाटली नाही का असा प्रश्न उपस्थित केला. गटारे नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून ते नागरिकांच्या घरात, दुकानात घुसून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे गटाराअभावी अन्य समस्यादेखील उद्भवतात. त्याचप्रमाणे सध्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक नागरिक आणि व्यापारी वर्गाचे नळ जोडण्या तुटल्या आहेत. याबाबत वारंवार सांगुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि कामांमुळे लांजावासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. गटारे, सर्व्हिस रोडचे काम तुम्हाला करता येत नसेल, तर सर्वच काम बंद ठेवा, असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला, नगरसेवक सचिन डोंगरकर यांनी सांगितले की गेल्या दीड वर्षापासून कुवे येथील नागरिकांचे भूसंपादनाचे पैसेही मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक लोक या पैशाची वाट बघत मरण पावले. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावावा. ठेकेदारांनी हे प्रश्न पुढील आठ दिवसात मार्गी लावावेत असे या वेळी सर्वांनी सांगितले.

एक जुलै रोजी पुन्हा बैठक
लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुवे ते लांजा कोर्ले फाटा इथपर्यंत महामार्गाच्या साईट सर्व्हिस रोड, गटात व पाईपलाईनचे काम पूर्ण करून दिले पाहिजे. वा कामांची पूर्तता किती झाली, कामे कुठपर्यंत आली आहेत याचा आढावा घेण्यासाठी १ जुलै रोजी पुन्हा बैठक घेऊ, असे यावेळी उपस्थित लांजा येथील नागरिकांनी बजावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 20/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow