मुर्शी तपासणी नाका येथे जनावरांच्या अवैध वाहतुकीची गाडी पकडली

Jun 24, 2024 - 11:21
Jun 24, 2024 - 14:29
 0
मुर्शी तपासणी नाका येथे जनावरांच्या अवैध वाहतुकीची गाडी पकडली

देवरूख : जनावरांची अवैध वाहतूक करणारी चारचाकी गाडी साखरपा पोलिसांनी रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील मुर्शी तपासणी नाका येथे पकडली. या कारवाईत पाळीव जनावरे व गाडी असा एकूण ५ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शाहूवाडी येथील दोन तरुणांवर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे. बाजीराव भिकाजी सुतार (वय ३७) व रविराज पांडुरंग व्हनागडे (२७, दोघेही रा. शाहूवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. बाजीराव व रविराज या दोघांनी गाडीतून शुक्रवारी (एमएच ०९, सीयू ६७०६) गाय, बैल, वासरे यांना दाटीवाटीने बांधून घेऊन जात होते.

मुर्शी तपासणी नाका येथे तपासणी दरम्यान ही गाडी थांबविण्यात आली असता जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या जनावरांमध्ये ३५ हजारांची गाय, २० हजारांचा जर्सी बैल, १ हजार रु. किमतीच्या वासराचा समावेश आहे. तसेच ४ लाख ५० हजार रूपये किमतीची गाडी जप्त केली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ (अ), ५ (ब) व ९ सह प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (घ) (डी) (एच), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ११९ सह, प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ चे कलम ४७ ते ५६ सह, भा. दं. वि. कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 24/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow