चिपळुण : 'नदी की पाठशाला' कार्यशाळेचा उत्साहात समारोप

Jun 25, 2024 - 12:29
Jun 25, 2024 - 12:30
 0
चिपळुण : 'नदी की पाठशाला' कार्यशाळेचा उत्साहात समारोप

चिपळूण : नद्या जोडून देश पूरमुक्त होणार नाही, तर माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल. तसेच चिपळूण पुरमुक्तीसाठी सह्याद्री पर्वत रांगा नेहमीच हिरव्यागार व्हायला हव्यात. असा आशावाद जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग यांनी चिपळूण येथे व्यक्त केला. चला जाणूया कार्यशाळेच्या निमित्त ते चिपळूण येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

येथील डीबीजे महाविद्यालयाच्या सभागृहात तीनदिवसीय नदी की पाठशाळा कार्यशाळा झाली. समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, चिपळुणात झालेली कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी. त्यासाठी नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू. या कार्यशाळेत चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी विस्तृत चर्चा झाली. या सर्वांनीच नद्या नियमीतपणे बारमाई निर्मल वाहिल्या पाहिजेत, अशी भावना व्यक्त केली. जर महाराष्ट्रातील नद्या निर्मल वाहिल्या तर हे राज्य खऱ्या अथनि 'महा'राष्ट्र होईल. 

महाराष्ट्राला समृद्ध राज्य व्हायचे असेल, तर धरणे बांधून समृद्ध होता येणार नाही. महाराष्ट्रात देशाच्या ४२ टक्के धरणे आहेत. तरीही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कारण, पाणी आणि नदी सोबत आपण जोडले गेलेलो नाही. ही नदी की पाठशाला नदीला माणसे जोडणारी आहे. यापुढील काळात राज्यात सर्व नगरपालिका क्षेत्रात, ग्रामपंचायत क्षेत्रात अशा पद्धतीच्या कार्यशाळा घ्याव्यात. आम्ही त्यासाठी पुढाकार घेऊ असे सांगितले. कोकणाविषयी बोलताना ते म्हणाले, कोकण हे देशात सर्वांत पाणीदार क्षेत्र आहे. येथे साडेतीन ते चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र, कोकणात स्वतःचे जलस्त्रोत नाहीत. त्यावर येथे काम झालेले नाही. पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरडया असतात. स्वतःचे जलस्रोत निर्माण झाल्या असत्या तर येथील नद्या बारमाई वाहिल्या असत्या. त्यामुळे चिपळूण अथवा कोकणाने स्वतःची वॉटर बँक निर्माण करायला हवी. त्यातून नद्या शुद्ध व निर्मळतेने वहायला मदत होईल. जर समुद्राला पाणी वाहून जात असेल तर त्याच वाया जाणाऱ्या पाण्याची वॉटर बँक तयार करायला हवी.

यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, प्रातांधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील, सुमन पांडे, शाहनवाज शाह, श्रिनीवास वडवागकर आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत झालेले ठराव...
सह्याद्रीची हिरवळ आणि चिपळूण पुरमुक्त करण्यासाठी सह्याद्री पर्वत रांगेत वृक्षतोड थांबवून तेथे गर्दझाडी निर्माण करावी. कोयनेचे अतिरिक्त अवजल कृष्णा खोऱ्यात सोडून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र या भागात पाणी वापरात आणावे. चिपळूणचा चला जाणूया नदीला उपक्रम राज्यभरात राबविण्यात यावा, नदीपात्रात कचरा व सांडपाणी सोडण्यात येणार नाही, असे चार ठराव यावेळी पारित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow