शासनाने तात्काळ कमिशन द्यावे; जिल्हा रेशन दुकान चालक संघटनेची मागणी

Jun 1, 2024 - 16:51
Jun 1, 2024 - 16:53
 0
शासनाने  तात्काळ  कमिशन द्यावे;  जिल्हा रेशन दुकान चालक संघटनेची  मागणी

चिपळूण : एकीकडे आम्हाला असलेले तुटपुंजे कमिशन शासन वेळेत देत नाही आणि आता आयएसओ मानांकनासाठी तयारी करा, असे सांगितले जात आहे. जर कमिशन वेळेत मिळत नसेल, तर मानांकन काय करायचे आहे? असा संतप्त सवाल जिल्हा रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आला. आधी वेळेत कमिशन द्या, त्यानंतरच मानांकनाचे बघू, अशी मागणी करतानाच सध्याचा खर्च भागत नसताना मानांकनासाठी २८ बाबींची पूर्तता कशी करणार, यावरही चर्चा झाली.
 
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यापासून दुकानदारांना कमिशन मिळालेले नाही. त्यामुळे दुकानांचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, विजबिल कोठून भरावे, असा प्रश्न सर्वांना पडला असल्याचे नमूद केले. तसेच कमिशन वाढवण्याबाबत शासन कोणत्याही हालचाली करीत नाही. असलेले तुटपुंजे कमिशनही वेळेत देत नाही, असे असताना आता दुकाने आयएसओ मानांकित करण्यासाठी दुकानदारांना सूचना देत आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावरील २८ बाबींची पूर्तता करायची आहे. त्यासाठी मोठा खर्च आहे. हा खर्च नेमका कोठून करावा, असा प्रश्नही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करताना जर शासन हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार नसेल तर पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, यावरही चर्चा झाली.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, सचिव प्रकाश आग्रे, दिलीप राणे, विजय राऊत, संतोष उतेकर, समाधान संसारे, महेश साबळे, रमेश राणे, अॅड. महेश नकाते, वैभव आंब्रे, प्रदीप मालुसरे आदी उपस्थित होते.

शासनाने कमिशन तत्काळ द्यावे
जानेवारी महिन्यापासून शासनाने दुकानदारांना कमिशन दिलेले नाही. प्रलंबित अनेक मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. हा दुकानदारांवर अन्याय असून शासनाने कमिशन तत्काळ द्यावे. अशोक कदम, जिल्हाध्यक्ष रास्त धान्य दुकानदार संघटना रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:18 PM 01/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow