चिपळूण : 'नदी की पाठशाला'चा पॅटर्न राज्यभर राबविणार : जलपुरुष राजेंद्र सिंह

Jun 27, 2024 - 11:25
 0
चिपळूण : 'नदी की पाठशाला'चा पॅटर्न राज्यभर राबविणार : जलपुरुष राजेंद्र सिंह

चिपळूण : चिपळुणात झालेली 'नदी की पाठशाला' लक्षात घेऊन जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी नुकतीच राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली व या भेटीत त्यांनी येथील 'नदीं की पाठशाला 'बाबत विस्तृतपणे चर्चा केली. यानंतर राज्यातील शहरांमध्ये व गावखेडयातदेखील 'नदी की पाठशाला' घेणे गरजेचे असल्याचे सूतोवाच केले व या बाबत त्यांनी संबंधितांना राज्यपाल कार्यालयाकडून सूचना देतील, असे स्पष्ट केले, शिवाय, यावेळी राज्यात सर्वप्रथम चिपळूण न.प.ने नदी की पाठशाला घेतली याचादेखील त्यांनी सन्मान केला.

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग, जलबिरादरी आणि चिपळूण न.प.च्या वतीने येथील डीबीजे महाविद्यालयात दि. २१ ते २३ जून दरम्यान नदी की पाठशाला हा कार्यक्रम घेण्यात आला. नदीचे प्रदूषण आणि पूर या मुद्दद्यांवर तीन दिवस मंथन करण्यात आले. राज्यभरातील अभ्यासक, या क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते यांनी आपले मत मांडले आणि या पुढच्या काळातदेखील नदीसाठी सजग राहाण्याचे ठरविण्यात आले. राज्यात प्रथमच चिपळूण न.प.ने यासाठी पुढाकार घेतल्याने जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी चिपळूण न.प.चे कौतुक केले आणि याबाबत तत्काळ हाच चिपळूण पॅटर्न राज्यात राबविण्यासाठी त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी, राज्यातील सर्व विद्यापीठे, त्यांचे कुलगुरू, राष्ट्रीय सेवा योजना या माध्यमातून सर्व विद्याथ्यांना नदी या विषयाशी जोडून घेण्याचे काम करण्यात येईल, अशा सूचना राज्यपालांनी सर्व कार्यालयांना देण्यात येतील असे सांगितले. या कार्यशाळेत कोकणातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली आहे. त्या माध्यमातून सर्व जिल्हा प्रशासनांनादेखील याबाबाबत सूचना देण्यात येईल. तशा सूचना राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात येतील, असे राज्यपाल रमेश बैस यांनी जलपुरुष राजेंद्र सिंह यांना सूचित केले.

मुख्य सचिव व कोकण आयुक्तांचीही घेतली भेट
चिपळुणातील 'नदी की पाठशाला' यशस्वी झाल्यानंतर जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर व कोकण विभागीय आयुक्त श्री. वेलरासू यांचीही जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी भेट घेतली च त्यांना या बाबत सर्व माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबत जातीने लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात येतील, असे सांगितले. तसेच कोकण आयुक्तांनीही जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण कोकण विभागासाठी कसे नियोजन करता येईल याची बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले, त्यामुळे आता राज्यभरात हा पॅटर्न राबवून नदीचे संवर्धन होणार आहे, असे डॉ. सुमंत पांडे यांनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow