चिपळूण : वाशिष्ठी नदीत बांधकामे हा भविष्यातील धोका : जलदूत शाहनवाज शाह

Jul 5, 2024 - 14:40
Jul 5, 2024 - 15:52
 0
चिपळूण : वाशिष्ठी नदीत बांधकामे हा भविष्यातील धोका : जलदूत शाहनवाज शाह

चिपळूण : चिपळूण शहरावर लाल व निळी पूररेषेची टांगती तलवार आहे. महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ आणि नदीतोल अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चिपळूण पालिकेकडूनच शहरातील विविध भागांत वाशिष्ठी नदीत गणपती विसर्जन घाट, धोबीघाट, आरसीसी संरक्षक भिंत घालण्याचा नवा 'घाट' घातला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही बांधकामे म्हणजे भविष्यात मोठा धोका असल्याचे जलदूत शाहनवाज शाह यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाकडे तक्रार करून या कामांची तातडीने चौकशी करावी व नदीपात्रातील बांधकाम काढून टाकावे, अशी मागणी केली आहे.

चिपळूण वाशिष्ठी नदीत बाजार पुलाच्या खालील भागात नदीपात्रात एक बांधकाम सुरू आहे. नदी ही जलसंपदा खात्याच्या मालकीची आहे. कोणालाही कायद्याने नदीपात्रात बांधकाम करता येत नाही. चिपळूणला पुराची मोठी समस्या आहे. यात नदीचे पात्र कमी केले जात आहे. तरी तातडीने या कामाची चौकशी होऊन नदीपात्रातील बांधकाम काढून टाकण्यात यावे अन्यथा आपल्याविरुद्ध कायदेशीर पावले उचलावी लागतील.

या संदर्भात शाह म्हणाले, "विविध कारणे व विशेषतः औद्योगिक जंगलतोडीमुळे वाशिष्ठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ आला आहे. यातच राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका यांनी जलसंपदा विभागाची कोणतीही परवानगी न घेता पाणलोट क्षेत्र, नदीची वहनक्षमता याचा विचार न करता नदीपात्रातच बेकायदेशीर बांधकामे केली आहेत. नदीपात्रात असा हस्तक्षेप करणे कायद्याने मोठा गुन्हा आहे. याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे."

चिपळूण पालिकेमार्फत शासनाच्या विविध योजनांमधून वाशिष्ठी नदीपात्रात गणपती विसर्जन घाट, धोबीघाट, संरक्षक भिंत व अन्य कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदानांतर्गत पेटकर बर्गीचासमोर गणपती विसर्जन घाट बांधण्यासाठी ३४ लाख ९५ हजार ५२८ रुपये, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजना २०२२-२३ अंतर्गत खेंड चौकी येथे वाशिष्ठी नदीकिनारी धोबीघाट बांधण्यासाठी १५ लाख ६७ हजार ११४ रुपये, वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान ठोक तरतूदअंतर्गत गंगाधर वाटेकर घरासमोर वाशिष्ठी नदीकिनारी गणपती विसर्जन घाट बांधण्यासाठी ३५ लाख १३ हजार ५९ रुपये, वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान ठोक तरतूद अंतर्गत मिठागरी मोहल्ला येथील मुमताज मिठागरी यांच्या घराशेजारी वाशिष्ठी नदीकिनारी धोबीघाट बांधण्यासाठी ३२ लाख ६९ हजार ८२२ रुपये, मुरादपूर समाज मंदिरासमोरील रस्त्याला वाशिष्ठी नदीकिनारी गणपती विसर्जन घाट बांधण्यासाठी ३५ लाख १५ हजार ८१३ रुपये, मुरादपूर रवींद्र शेडगे घरासमोरील नदीकिनारी गणपती विसर्जन घाटाकरिता आरसीसी संरक्षक भिंत बांधण्यासाठी १९ लाख १८ हजार, ८३१ रुपये (अंदाजपत्रकीय रक्कम) आदी कामांचा समावेश आहे. जलदूत शाहनवाज शाह यांनी जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाला याबाबत निवेदन दिले आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 05/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow