रत्नागिरी : कळझोंडीत सिमेंटयुक्त पाणी नदी, नाल्यात; पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

Jun 27, 2024 - 11:07
Jun 27, 2024 - 15:12
 0
रत्नागिरी : कळझोंडीत सिमेंटयुक्त पाणी नदी, नाल्यात; पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गणेशवाडी एस. टी. स्टॉप येथून नजीकच असलेल्या वैष्णव ए. ए. सी. कंपनीतून सिमेंट ब्लॉक बनविण्यात येत आहेत. या कंपनीला संरक्षक भिंत नाही. त्यामुळे या कंपनीतील उघड्या परिसरात टाकलेली सिमेंटची पावडर (राख) मोठ्या प्रमाणात नदी, नाले, ओढे यातून वाहून जात असून, येथील विहिरी व धरणाच्या पाण्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कळझोंडी गणेश वाडी येथे ही कंपनी अनेक वर्षे कार्यरत आहे. या कंपनीतून राखेचे जाणारे पाणी कुंभवणेवाडी येथील विहिरीत व नदीमार्फत धरणाच्या पाण्यात जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. कुंभवणेवाडी येथील विहिरीत व नदीत या सिमेंटच्या राखेचे थर साचले आहेत. त्यामुळे या पाण्याचा रंग बदलला आहे. सध्या या भागात पावसाचे प्रमाण थोडं कमी आहे. अचानक पावसाने तीव्र रूप धारण केले तर या कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेली सिमेंटची राख व कच्चे व खराब झालेले सिमेंटचे ब्लॉक कातळावर पावसाच्या दिवसातही उघड्यावर टाकून ठेवलेले आहेत. त्यामुळे जोराच्या पावसाने ही राख नदी नाल्यामार्फत धरणाच्या पिण्याच्या पाण्यात जाण्याची फार मोठी शक्यता निर्माण झालेली आहे.

कळझोंडी धरणातून जयगड प्रादेशिक नळ पाणी योजनेद्वारे परिसरातील १४ ग्रामपंचायत व २७ गावांना पाणीपुरवठा केला जातो शासनाचे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे धोरण आहे. परंतु कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे या धरणातील पाणी अशुद्ध होण्याची दाट शक्यता आहे. तरी कंपनीने त्वरित कायमस्वरुपी कंपाउंड वॉल बांधून घ्यावी व परिसरात साचलेली पावडर, राखेचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी कळझोंडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार, पांडुरंग सनगरे, महादेव आग्रे, किशोर पवार, वासुदेव घाणेकर यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow