लांजा शहराचा वीजपुरवठा अखेर सुरळीत..

Jun 28, 2024 - 10:43
Jun 28, 2024 - 10:47
 0
लांजा शहराचा वीजपुरवठा अखेर सुरळीत..

लांजा : लांजा शहरासह तालुक्याचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुसळधार पावसाची तमा न बाळगता महावितरणचे तांत्रिक कर्मचारी आणि वायरमन यांनी रात्री-अपरात्री काम केले. मंगळवारी रात्री उशिरा वीजपुरवठा अखेर सुरळीत झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रसंगी जंगलातून वाटा काढत त्या कर्मचाऱ्यांनी लांजावासियांचा प्रश्न सोडवला. लांजा शहराला वीजपुरवठा करणाऱ्या अकरा विजेच्या नवीन खांबांसाठी तातडीने सर्वे करण्यात येणार आहे.

विजेचा सतत लपंडाव सुरू असल्यामुळे लांजा तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सततच्या तक्रारीमुळे लांजा शहरासाठी स्वतंत्र फीडर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र फीडद्वारे वीजपुरवठा करावा, अशी मागणीही केली जात आहे. या संदर्भात आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी महावितरणवर धडक दिली होती.

तसेच दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर महावितरणकडून दुरुस्ती कामांना वेग आला. गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा अडथळाही होता. भौगोलिक परिस्थितीवर मात करत महावितरणचे कर्मचारी २४ तास सेवा बजावत होते. काल दिवसभर त्यांनी काम करत वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तांत्रिक बाजू आणि दोष यामुळे वीज गायब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे; मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर लांजावासियांकडून कौतुकाची थाप दिली जात आहे. 

यामुळे होतो वीजपुरवठा खंडित...
तालुक्यात लांजा शहरासह उपळे-विरगाव येथे दोन फिडर मंजूर आहेत. लांजा येथे उपकेंद्रही कार्यान्वित झाले आहे. लांजा फिडर ते आडवली रेल्वेस्टेशन येथे फिडरवरून वीजपुरवठा होण्यासाठी लांजा-दाभोळे या राज्यमार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. या मार्गाची हद्द निश्चित नसल्यामुळे फिडर उभारण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. लांजा शहराला वीजपुरवठा करण्यासाठी सिंगल फेज आहे. तो थ्री फेजमध्ये बदलण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे; परंतु त्या कंपनीने अद्याप ते काम सुरूच केलेले नाही. भांबेड-ओणी ते लांजा वीजवहन यंत्रणा कार्यान्वित आहे. रत्नागिरी ते चांदराई येथून लांजा येथे होणारा वीजपुरवठा हा भूमिगत वीजवाहिन्यांमधून केला जात आहे. ओणी येथून लांजा तालुक्याला वीजपुरवठा केला जातो. तोडकरी ते शहनाई हॉल या परिसरात अकरा वीजखांबांची आवश्यकता आहे. त्याचे सर्वेक्षण तातडीने करावे लागणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow