चिपळूण विधानसभेवर शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांचा दावा

Jul 1, 2024 - 10:30
 0
चिपळूण विधानसभेवर शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांचा दावा

चिपळूण : विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात कोणतीच चर्चा किंवा हालचाल नाही. परंतु मी चिपळूण संगमेश्वरमधून निवडणूक लढणारच नाही, शिवसेनेला ही जागा मिळणारच नाही, असा विचार कोणी करू नये. आपण विधानसभेच्या स्पर्धेत राहणार असे शिवसेनेचे उपनेते व माजी आ. सदानंद चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट करून चिपळूण विधानसभेवर दावा केला आहे.

ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांचा देखील आग्रह आहे. त्यामुळे मी निवडणुकीची तयारी सुरू केली असून मी निवडणूक लढणार आहे, अशा स्पष्ट शब्दात माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपली भूमिका रविवारी (दि. ३०) दुपारी स्पष्ट केली आहे. नुकताच सादर झालेला पुरवणी अर्थसंकल्पाबाबत पूर्ण समाधान व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री तसेच महायुती सरकारचे अभिनंदन केले. यावेळी झालेल्या सदानंद चव्हाण पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय प्रश्नांना देखील दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले महायुतीचे सरकार आहे. महायुती म्हणून पुढील निवडणुका लढवल्या जाणार आहेत. पण त्यावेळी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळणार नाही. असा विचार तरी आपण का करावा? शेखर निकम आमदार आहेत म्हणून त्यांनाच उमेदवारी मिळेल, आपल्याला काहीच मिळणार नाही असा विचार करून आपण मागे का रहावे किंवा माझ्यासाठी शेखर निकम यांनी मागे राहावे, असेही होऊ शकत नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

एक वेळ पराभव झाला असला तरी तो कायमचा ठरवून गप्प बसण्यातला मी नाही. चिपळूणमध्ये शिवसेना उमेदवाराचा डिपॉझिट जप्त झाले होते. त्यातून आम्ही येथे पक्ष उभा केला आहे. माझ्या शिवसैनिकांनी तनमनधन अर्पण करून संघटना उभी केली आणि तब्बल १९ हजारांचे मताधिक्य देऊन मला आमदार केले. एक नव्हे तर दोन वेळा संधी दिली. तिसऱ्या वेळा आमच्या काही चुका झाल्या. त्यामुळे पराभव झाला. पण त्याचे आत्मपरीक्षण करून पुन्हा अशा चुका होणार नाहीत याची काळजी देखील मी घेतलेली आहे. त्यामुळे आता अडचण तशी काहीच दिसत नाही, असेही ते म्हणाले.

कोणाला उमेदवारी मिळू नये या मताचा मी अजिबात नाही. प्रत्येकाचा पक्ष आहे, प्रत्येकाचा तो अधिकार आहे. पण आम्ही लढायचेच नाही असा विचार देखील करू नये. महायुतीचे जागा वाटप होईल त्यावेळी चित्र स्पष्ट होईल. पण मला खात्री आहे. मी ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी मला उमेदवारीचा शब्द दिला होता. मुख्यमंत्री आपला शब्द पूर्ण करतात हे मला माहित आहे. त्यामुळे मी निवडणुकीच्या तयारीला लागलो असून कार्यकत्यांना देखील कामाला लागण्याच्या सूचना दिले आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे, असे ठामपणे सदानंद चव्हाण म्हणाले. उमेदवारी मिळाली नाही तर...? या प्रश्नाला त्यांनी ते त्यावेळी बघू, आताच का नकारात्मक बोलायचे, जे घडलेच नाही त्याबाबद्दल आता बोलणे योग्य नाही असे सूचक उत्तर देखील यावेळी त्यांनी दिले.


यावेळी तालुकाप्रमुख संदेश आयरे, शरद शिगवण, शहरप्रमुख उमेश सकपाळ, महिला संघटक रश्मी गोखले, दिलीप चव्हाण, शशी चाळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow