आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवऱ्यासहित दीर, सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा; तिघांना पोलीस कोठडी

Jul 2, 2024 - 09:47
 0
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवऱ्यासहित दीर, सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा; तिघांना पोलीस कोठडी

दापोली : तालुक्यातील गव्हे ब्राह्मणवाडी येथे 27 वर्षीय विवाहीतेला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुरज म्हाब्दी, सासरा संजय म्हाब्दी, दीर आकाश म्हाब्दी यांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दापोली मधील गव्हे येथे राहणारी सिया म्हाब्दी या 27 वर्षीय महिलेने 2 वर्षाचा समर या मुलाला घेऊन घराशेजारी असणार्‍या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सिया हिचा भाऊ विनोद गुरव (रा. आसूद) याने दापोली पोलीस स्थानकात फिर्याद देऊन आपल्या बहिणीला वेळोवेळी मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद पोलीस स्थानकात दाखल केली होती. या फिर्यादीनुसार दापोली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

सिया म्हाब्दी हिने सुरज याच्यासोबत 26 एप्रिल 2021 रोजी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे विवाह केला होता. विवाह नंतर सिया व सुरज हे दिवा या ठिकाणी गुरव रहात असलेल्याच बिल्डिंगमध्ये मुंबईला राहण्यासाठी गेले. सिया ही ठाणे येथील एका क्लिनिक मध्ये कामाला होती. लग्नानंतर दीड वर्षातच सिया व पती सुरज यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली होती. सुरज याला दारूचे व्यसन लागल्यामुळे तो बहिणीला मानसिक त्रास देत होता. तसेच घराकडे त्याचे लक्ष नव्हते. तो सिया हिला मारहाण देखील करत होता. या सर्व गोष्टी सिया आपल्या भाऊ व आईला सांगत होती. त्यांनी वेळोवेळी सुरज याला समजावले होते. सुरज हा मित्रांकडून उसने पैसे घेऊन सिया हिचा फोन नंबर देत होता. त्यामुळे हे सर्वजण सिया हिला फोन करून विचारणा करत होते. ही परिस्थिती पाहता विनोद याने सुरज याला चांगले काम शोधून देतो असे सांगितले. त्या वेळेला सुरज याने मी दापोलीला जाऊन गाडी चालवेल असे सांगून सिया हिला मुंबईत ठेवून मार्च महिन्यात गव्हे येथे निघून आला होता. एका महिन्यानंतर पुन्हा मुंबईत जाऊन सिया हिला शिवीगाळ करून मारहाण केली होती. यावर दोन्ही घरातील प्रमुख मंडळी एकत्र बसून सुरज याला समजावले होते. सुरज कोणतेही काम न करता मित्रांसोबत इकडे तिकडे फिरत असे व सिया हिला शिवीगाळ करून मारहाण करत असे. घर खर्चाला पैसे देण्यास टाळाटाळ करीत असे. तू मुलाला घरी ठेवून निघून जा असे सारखे सांगून तो मानसिक त्रास देत होता.

नोव्हेंबर 2023 मध्ये सुरज याने कोटक फायनान्स कडून कर्ज घेऊन दोन मोबाईल घेतले होते त्याचे हप्ते चालू होते. सिया गावी आल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी कोटक फायनान्स कंपनीचे लोक मुंबई येथे ज्या ठिकाणी सिया राहत होती तिथे गेले व विचारपूस करत होते. त्यांनी घेतलेल्या मोबाईलचे हप्ते न भरल्याने फायनान्स वाल्यांनी तगादा लावल्यानंतर सिया हिने सोन्याचा हार चैन व दोन अंगठ्या विकून फायनान्स वाल्यांना पैसे देतो असे सांगून सदर पैशाने मौज मजा केली याची विचारणा केली असता सिया हिला मारहाण करत शिवीगाळ केली. सिया हिने साठवलेले 60 ते 70 हजार रुपये तिला न सांगता घेऊन खर्च केले तसेच तिचे मंगळसूत्र देखील दिवा येतील स्पेशल ज्वेलर्स येथे गहाण ठेवून पैसे घेतले होते. सदर मंगळसूत्र देखील विनोद गुरव यानेच सोडवून दिले होते. सुरज हा बहिणीला जास्तच त्रास देऊ लागल्याने विनोद गुरव त्याची आई विजया गुरव, वडील विजय गुरव, भाऊ विश्वास गुरव असे सर्वजण पाच मे रोजी गावी येऊन सिया हिच्या सासरी गव्हे येथे गेले. तेथे त्यांचे नातेवाईक लक्ष्मण गुरव हे देखील हजर होते. ङ्गत्यांनी घरामध्ये सिया हिचे सासरे संजय म्हाब्दी, सासु सुजाता, दीर आकाश व पती यांना एकत्र घेऊन बहिणीला मारहाण का करता, असे विचारणा केली. त्या वेळेला आम्ही सुरज याला समजावून सांगतो त्याची जबाबदारी आम्ही घेतो, असे तिच्या घरातल्यांनी सांगितले होते. सिया हिच्या आईचा आसूद येथे अपघात झाल्यानंतर तिच्या मदतीला सिया आपल्या मुलाला घेऊन आसूद या ठिकाणी काही दिवस राहायला आली होती. तेव्हा नवरा, सासू, सासरे, दीर हे सर्वजण मलाच सारखे बोलत असतात. तुझ्यामुळे भांडणे होतात, तू मेलीस तर आम्हाला चालेल अशा प्रकारचे वक्तव्य करून मानसिक त्रास देत असल्याचे विनोद याने फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीनुसार सिया हिचा नवरा सासू-सासरे दीर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. गंगधर करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 02-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow