चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात आमसभा घेण्याची मागणी

Jul 3, 2024 - 11:35
 0
चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात आमसभा घेण्याची मागणी

चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील आमसभा गेली अनेक वर्षे रखडली आहे ती लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी करत माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत चिपळूण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांच्याकडे निवेदनही दिला आहे. गेल्या चार वर्षांत आमसभाच झाली नसल्यामुळे लोकांच्या प्रश्नाला वाचा फुटलेली नाही.

विधानसभा मतदार संघामध्ये जनतेला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणे व त्याचे निवारण करणे यासाठी प्रचलीत पद्धतीनुसार वार्षिक आम (जन) सभेचे आयोजन केले जाते. या आमसभेचे आमदार हे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. आमसभा हे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात येणारे अडथळे तसेच विविध शासकीय कार्यालयाकडून होणाऱ्या अन्याय व दुजाभावाच्या वागणुकीबाबत व्यथा व गा-हाणे थेट शासकीय अधिकाऱ्यांसमक्ष मांडता येते. आमदारांपुढे प्रश्न मांडून अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचे व न्याय मिळवण्याचे आमसभा हे हक्काचे व्यासपीठ आहे; मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात एकदाही वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आलेले नाही, ही बाब फारच गंभीर आहे. आमसभेचे सचिव म्हणून गटविकास अधिकाऱ्यांची जबाबदारी असून, त्यांचे कर्तव्य म्हणून आमसभेचे नियोजन झाले पाहिजे, याची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे तसेच अशी आमसभा ५ वर्षांचा विधानसभा निवडणूक कालावधी संपण्यापूर्वी आयोजित केली जाईल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी मुकादम यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow