विद्यार्थ्यांना ऑगस्टपर्यंत गणवेश मिळणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Jul 3, 2024 - 11:41
 0
विद्यार्थ्यांना ऑगस्टपर्यंत गणवेश मिळणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : येत्या ऑगस्टपर्यंत सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेशांचे वाटप पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा कार्यक्रम आणि राज्य योजनेतून दोन मोफत गणवेश देण्यात येत आहेत. या गणवेशाचा दर्जा आणि रंग समान असावेत म्हणून राज्यात 'एक राज्य, एक गणवेश' योजना चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. त्यासाठी शासनाच्या खरेदी धोरणानुसार निविदा प्रक्रिया राबवून कापड पुरवठा सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गणवेश किती चांगले दिले जात आहेत, हे सांगताना त्यांनी दोन गणवेश सभागृहात दाखविले.

ते म्हणाले की, दोन गणवेशांपैकी एक गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत शिलाई करून देण्यात येणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्काऊट व गाईड्सच्या गणवेशाचे कापड शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात येत आहेत. शालेय शिक्षण विभागाने गणवेशाच्या कापड खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. ऑगस्टपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधींच्या उल्लेखामुळे गदारोळ
एमटीएचएल अटल सेतू आमच्या सरकारने पूर्ण केला आहे. खरे तर असा सेतू पूर्ण करण्याचे स्वप्न पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाहिले होते. आमच्या सरकारने पंडित नेहरूंचे स्वप्न पूर्ण केले, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काँग्रेसला लगावला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी म्हणाले होते की, वर्षाला १ लाख रूपये खटाखट खात्यात येतील, असा उल्लेख केला. त्यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्हाला अर्थसंकल्पानंतर विरोधक विचारतात की पैसे कुठून आणणार. पण खटाखट बोलले तेव्हा का नाही विचारले?

नमो योजनेतून शेतकऱ्यांना ५,३१८ कोटींचा लाभ
नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत ९२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना ५ हजार ३१८ कोटी ४७ लाख रुपयांचा लाभ दिला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत २९ हजार ६४० कोटी रुपये सोळा हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा करणे सुरू आहे.
कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांची उत्पादकता वाढवणार आहोत. मूल्यवर्धित साखळींसाठी ३४१ कोटी रुपयांची विशेष कृती योजना आखली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत १४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून ५ हजार १९० कोटी रुपये दिले. पीक कर्ज मंजूर करताना सिबिलचा वापर करून कर्जापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, अशा सूचना बँकांना दिल्या आहेत. प्रसंगी संबंधित बँकांवर एफआयआर नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीत ३० टक्के कृषी पंप सौर ऊर्जेने जोडणार. मागेल त्याला सौर कृषी पंप आणि दिवसाकाठी वीज देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow