राजापूर : सायबाच्या जुन्या धरणाजवळ नवे धरण उभारणार; वाढीव निधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

May 29, 2024 - 10:49
May 29, 2024 - 10:56
 0
राजापूर : सायबाच्या जुन्या धरणाजवळ नवे धरण उभारणार; वाढीव निधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

राजापूर : राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत असलेले आणि भविष्यात शहराला मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या जुन्या धरणाजवळ नवीन धरण बांधण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक वाढीव निधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. विधानसभा अधिवेशनापूर्वी हा निधी मंजूर होईल, असे माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी सांगितले.

भविष्यात राजापूर शहराचा होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या हे लक्षात घेऊन सायबाच्या जुन्या धरणाजवळ नवे धरण उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी आमदार अॅड. खलिफे हे यासाठी प्रयत्न करीत आहेत. नव्या धरणामुळे शहराला दरवर्षी भेडसावणारी पाणीटंचाई संपुष्टात येईल. सध्या नव्या धरणाचे बांधकाम निधीअभावी थांबले आहे. वाढीव निधीचा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे सादर केला आहे. याबाबत खलिफे म्हणाले, या धरणासाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे प्रयत्न केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपये निधी मंजूर केला होता; मात्र प्रत्यक्षात धरणाचे काम सुरू झाल्यानंतर आणखीन सात कोटीची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध व्हावा म्हणून विधानसभेत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अमिन पटेल यांनी मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच विधान परिषदेत भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या धरणाच्या प्रश्नावर मंत्री गिरीष महाजन यांनी निधी देऊ, असे सांगितले होते. पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंत यांनीही यासाठी पाठपुरावा केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही संपर्क साधला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली होती. शासनाने निधी देण्याबाबत निर्णय घेतला नाही तर यासाठी बैठकीचे आयोजन करून निर्णय घेऊ, अशी ग्वाहीही नार्वेकर यांनी दिली होती. विधानसभेपूर्वी होणाऱ्या अधिवेशनात वाढीव निधी मंजूर होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 29/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow