विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे!, विजय वडेट्टीवारांची खोचक टीका

Jul 5, 2024 - 16:06
 0
विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे!, विजय वडेट्टीवारांची खोचक टीका

मुंबई : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर विश्वविजेता भारतीय संघ आज मायदेशात परतला. गुरुवारी भारतीय संघ मुंबईत आल्यानंतर मोठ्या जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान, आता टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेल्या चार महाराष्ट्रीयन खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार होणार आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली.

विधिमंडळ इमारत परिसरामध्ये टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो वापरून आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वागताचे फलक जागोजागी लावले आहेत. यावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटद्वारे खोचक शब्दांत सरकावर टीका केली आहे. ते म्हणाले, "या तिघांचं काय योगदान? विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे! विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघात असलेल्या मुंबईतील खेळाडूंचा विधान भवनात आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सत्कार सोहळ्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये एक तरी खेळाडू दिसतोय का? घेणं न देणं फक्त क्रेडिट घेण्याची घाई!"

दुसरीकडे, यावरून आमदार रोहित पवार यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी या फलकाचा फोटो दाखवत सत्ताधारी यांना फलकबाजी करण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. भारतीय संघ हा सर्वांचा आहे, देशाचा आहे. त्यामुळे स्वतःचे फलक लावण्यात सत्ताधाऱ्यांनी समाधान मानले. भारतीय संघाचे फोटो वापरून खाली सत्ताधारी आणि विरोधकांचे नाव वापरले असते, तर अधिक चांगला संदेश गेला असता. परंतु सत्ताधाऱ्यांना फलकबाजी करण्यातच आनंद वाटतो, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता विधानभवन येथील सेंट्रल हॉलमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 05-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow