रत्नागिरी : जिल्ह्यात सोळा लाख नागरिकांना मोफत उपचार

Jul 11, 2024 - 16:16
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात सोळा लाख नागरिकांना मोफत उपचार

रत्नागिरी : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आता सर्व रेशनकार्डधारकांनाच मिळणार आहे. शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची कोणतीच मर्यादा ठेवलेली नाही. त्यामुळे १ जुलैपासून या योजनेअंतर्गत अंतर्भूत असलेल्या खासगी रुग्णालयांत ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळत आहेत. आता या योजनेचा लाभ जिल्ह्यातील एकूण ४ लाख २६ हजार ५९९ रेशनकार्डवरील १६ लाख ६१ हजार ५६२ नागरिकांना मिळणार आहे.

पांढऱ्या रेशनकार्डधारकांनाही मात्र आपले रेशनकार्ड ऑनलाइन करून घ्यावे लागणार आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होत होते; मात्र, त्यात २०१९ मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार ही योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अशा एकत्रित योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळू लागले आहेतच; पण आता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२ खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. यात हृदयाचे आजार, कर्करोगविषयक शस्त्रक्रिया, हाडांच्या शस्त्रक्रिया, मेंदूविषयक आदी आजारांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. उपचार किंवा शस्त्रक्रियांचा पाच लाखांपर्यंतचा खर्च शासन करणार आहे. यात ३३ विशेष रोगांकरिता कॅशलेस उपचार आणि शस्त्रक्रिया उपचार मोफत होणार आहेत. यात उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आली आहे. पिवळे, केशरी, पांढरे रेशनकार्डधारक यांनाही या योजनांचे लाभ मिळणार आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचारांचा लाभ आता सर्वच नागरिकांना मिळणार आहे. त्यासाठी सर्वच रेशनकार्डधारकांनी आपले रेशनकार्ड लवकरात लवकर ऑनलाइन करावे. अशी माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. रेणुका चौघुले यांनी दिली.

…या रुग्णालयात मोफत उपचार
जिल्हा शासकीय रुग्णालय, कामथे, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय या सरकारी रुग्णालयांबरोबरच वालावलकर रुग्णालय डेरवण, रामनाथ हॉस्पिटल रत्नागिरी, परकार हॉस्पिटल, घरडा हॉस्पिटल, लाइफकेअर हॉस्पिटल चिपळूण, अपरांत हॉस्पिटल चिपळूण, एसएमएस हॉस्पिटल चिपळूण या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow