चिपळूण : वालावलकर रुग्णालयामध्ये 'सेंटर फॉर न्यूक्लियर मेडिसीन' विभागाचा उद्या शुभारंभ

Jul 13, 2024 - 12:00
Jul 13, 2024 - 17:03
 0
चिपळूण : वालावलकर रुग्णालयामध्ये 'सेंटर फॉर न्यूक्लियर मेडिसीन' विभागाचा उद्या शुभारंभ

चिपळूण : आजकालच्या अत्यंत गतिशील युगात उत्तम आरोग्य राखण्यासाठी आजाराचे जलद निदान, योग्य उपचार हाच मंत्र आवश्यक आहे. त्यातूनच ऊर्जितावस्थेत असलेल्या न्यूक्लियर मेडिसीन किवा न्यूक्लियर इमेजिंग शाखेचा उगम झाला आहे. ज्यामध्ये रोगाचे निदान करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर केला जातो. चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाने सेंटर फॉर न्यूक्लियर मेडिसीन विभाग कार्यान्वित केला असून, त्याचा शुभारंभ दि. १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता टाटा मेमोरियलचे अधिष्ठाता डॉ. सुदीप गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे.

न्यूक्लियर मेडिसीन इमेजिंग आणि इतर रेडिओलॉजिकल चाचण्यांमधला (एक्स-रे, सी.टी) मुख्य फरक म्हणजे न्यूक्लियर मेडिसीन इमेजिग हे नुसतेच अवयवाची रचना कशी आहे हे न पाहता अवयवाचे कार्य कसे आहे, याचे मूल्यांकन करते. त्यामुळे याला फिजियोलॉजिकल इमेजिंग मोडॅलिटी म्हणजे शरीरातील रचनेपेक्षा त्याच्या कार्याशी संलग्न असणारे तंत्रज्ञान म्हणतात. सिंगल फोटॉन एमिशन कॉम्प्युटेड टोमोग्राफी (स्पेक्ट स्कॅन) आणि पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पेट स्कॅन) हे न्यूक्लियर मेडिसीन किंवा न्यूक्लियर इमेजिंगमध्ये सर्वात महत्वाची पद्धती आहेत.

स्पेक्ट (सिंगल-फोटॉन उत्सर्जन संगणकीकृत टोमोग्राफी) स्कॅन हा इमेजिंग चाचणीचा एक प्रकार आहे, जो किरणोत्सर्गी पदार्थ आणि थ्रीडी चित्रे तयार करण्यासाठी एक विशेष कॅमेरा वापरतो. सीटी, एमआरआय, इमेजिंग चाचण्या, अंतर्गत अवयव कसे दिसतात हे दाखवले जाते. स्पेक्ट स्कॅन मशीन अवयव किती चांगले काम करत आहेत हेही दाखवतात. स्पेक्ट स्कॅनद्वारे हाडांमध्ये पसरलेल्या कर्करोगाचे निदान करता येते व आजाराचा आढावा घेता येतो. तसेच हाडांमधून बायोप्सी कोठून घ्यायची यांचेही मार्गदर्शन करते. हाडांचे फॅक्चर शोधण्यासाठी हातातील शिरेमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ ट्रेसर (आयव्ही) सोडला जातो. ट्रेसरचा डोस खूपच लहान असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. स्कॅन करण्यापूर्वी २० मिनिटे खोलीत शांतपणे बसण्यास सांगितले जाऊ शकते. 

त्यादरम्यान शरीर रेडिओऑक्टव्ह ट्रेसर शोषून घेतो. आणि मग स्पेक्ट मशीनमधील कॅमेरा शरीराद्वारे शोषलेले किरणोत्सर्गी ट्रेसर शोधू शकते. संगणकाद्वारे या छायाचित्रांचा अभ्यास करून आजार शोधला जातो. साधारण १० ते ३० मिनिटे एवढा वेळ स्पेक्ट स्कॅनला लागू शकतो. या सर्व अत्याधुनिक स्कॅन आणि उपचारपद्धती मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरात उपलब्ध आहेत, पण त्या आता आपल्या कोकण विभागामध्ये भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात कमी दरामध्ये रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अद्ययावत उपचार पद्धती ग्रामीण भागातील रुग्णांनाही उपलब्ध व्हावी आणि त्याचे आयुष्य निरामय राहावे, याकरिताच वालावलकर रुग्णालयाने सेंटर फॉर न्यूक्लियर मेडिसीनची स्थापना एका इमारतीत केली आहे. केंद्रासाठी कोटक महिंद्रा बँक आणि रमा पुरुषोत्तम फौंडेशन यांचेही योगदान आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:28 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow