करपा रोखण्यासाठी पिकांची रोज पाहणी करण्याचा सल्ला

Sep 19, 2024 - 17:22
Sep 19, 2024 - 17:30
 0
करपा रोखण्यासाठी पिकांची रोज पाहणी करण्याचा सल्ला

रत्नागिरी : सप्टेंबर महिन्यातील ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणारा पाऊस त्यानंतर उघडीप घेतल्यानंतर पडणारे ऊन हे वातावरण पिकावर करपा सदृश रोगाच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. यासाठी शेतकऱ्यांनी कापणीच्या तोंडावर आलेल्या पिकाची दैनंदिन पाहणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने जारी केला आहे.

करपा हा रोग पायरीक्लुलेरिया ग्रीसी नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थेमध्ये म्हणजेच रोपवाटिकेत फुटवे येण्यावेळी, दाण्यावरही आढळतात. रोपवाटिकेत भात बियाण्याची पेरणी केल्यावर रुजून आलेल्या रोपांवर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. प्रथमतः रोपांच्या पानावर जांभळ्या रंगाचे ठिपके निर्माण होऊन पाने वाळतात व रोपे मरतात. पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी रोपांची लावणी करताना रोगग्रस्त रोपांची लावणी केल्यास हा रोग शेतात फैलावतो. लावणीनंतर या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. सुरुवातीला आकाराने छोट्या असलेल्या ठिपक्यांचे आकारमान वाढत जाऊन मोठे होतात. हे ठिपके दोन्ही बाजूला वाढतात.

पिकाच्या वाढीच्या पुढच्या अवस्थेत म्हणजेच दाणे भरण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव होतो. रोगग्रस्त दाण्यावर काळपट रंगाचे ठिपके दिसून येतात. यामुळे दाणे निमुळते होऊन मध्यभागी फुगीर होतात. त्यांच्या कडा जांभळट रंगाच्या असून, मध्यभाग करड्या रंगाचा असतो. रोगकारक बुरशीची बीजे निर्माण झाल्यावर ठिपक्यांचा मध्यभाग राखाडी रंगाचा होतो. पानावर निर्माण झालेली बुरशी बीजे पाऊस व वाऱ्यामार्फत शेतात सर्वत्र पसरतात व भात खाचरातील सर्व रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक त्या खबरदाऱ्या घेण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow