खेड : तीन तालुक्यांना जोडणाऱ्या कोरेगाव संगलट बौद्धवाडी रस्त्याची दुरवस्था

May 30, 2024 - 12:05
May 30, 2024 - 12:31
 0
खेड : तीन तालुक्यांना जोडणाऱ्या कोरेगाव संगलट बौद्धवाडी रस्त्याची दुरवस्था

खेड : तालुक्यातील अती महत्वाचा आणि मंडणगड-दापोली-गुहागर यांना जोडला जाणारा रस्ता म्हणून ओळखला जातो तो कोरेगाव संगलट बौध्दवाडी रस्ता. मात्र सध्या या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दापोली मंडणगड गुहागर तालुकावासीयांचा प्रवास यंदाही खड्यातूनच करावा लागणार आहे. मे महिना संपत आला तरी रस्ता दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. केवळ लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे निमित्त ठरल्याने याचा त्रास येथील ग्रामस्थांना सहन करावा लागणार असून, या बेफिकीर कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने आणि तीन तालुक्याला जोडणाऱ्या मार्गाची अनेक वर्षे देखभाल दुरुस्ती झालेली नाही. या ५ कि.मी. च्या टप्प्यात प्रचंड खड्डे पडले असून, खडी अस्ताव्यस्त पसरली आहे. तसेच एक ते दीड फूट पडलेले खड्डे यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे. दुरुस्तीबाबत येथील ग्रामस्थांनी निवेदन देऊनही त्यांच्या मागणीला बांधकाम विभागाने 'वाटाण्याच्या अक्षता' दाखवल्या आहेत. या मार्गावर खेड दापोली आगाराच्या एसटी बस धावतात. या गाड्यांना प्रवासी भारमानही चांगले आहे. मात्र हा रस्ता चांगल्या स्थितीत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मतदार राजा नाराज 
स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कोरेगाव संगलट रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये अनेक लोकप्रतिनिर्धीनी अनेक विकासाची गाजरे दाखवली. मात्र या रस्त्याची दुरूस्ती अद्याप झालेली नसल्याने येथील ग्रामस्थांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता धोकादायक बनल्याने या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील जनता आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहत असून येत्या निवडणुकीमध्ये हिशोब चुकता करण्याचा विचारही मतदार राजा करत असल्याचे बोलले जात आहे.

वळणांवर झाडाझुडपांचा मोठा अडथळा
या रस्त्यावर वळणांचे प्रमाण मोठे असून झाडाझुडपांचा वेढा पडला आहे. यामुळे समोरून येणारे वाहनही दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या अरुंद रस्त्यात साईडपट्टीही गायब झाल्यामुळे एकावेळी दोन मोठ्या वाहनांना या मार्गावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 30/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow