रखडलेल्या रेल्वेगाड्यांमधील साडेचार हजारहून अधिक प्रवासी एसटीने रवाना

Jul 17, 2024 - 10:56
 0
रखडलेल्या रेल्वेगाड्यांमधील साडेचार हजारहून अधिक प्रवासी एसटीने रवाना

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रेल्वेने आठ रेल्वे गाड्यांमध्ये अडकून राहिलेल्या चार हजार ६२३ प्रवाशांना एकूण १०३ एसटी बसेसमधून मुंबईच्या दिशेने पाठविले.


खेड तालुक्यातील दिवाणखवटीनजीक गेल्या रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असताना दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. त्यामुळे १४ आणि १५ जुलै रोजी या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. विविध स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना कोकण रेल्वेने शेकडो एसटी बसेसमधून मुंबई तसेच पनवेलच्या दिशेने पाठवले.

सुमारे २४ तासांनी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळलेल्या ठिकाणचा मार्ग वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. वाहतूक सुरू होताच मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसची रिकामी गाडी पहिल्यांदा मुंबईकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यापाठोपाठ राहिलेल्या इतर गाड्यादेखील रवाना करण्यात आल्या. आता हळूहळू कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्वस्थितीत येऊ लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 17-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow