'नवनिर्माण हाय'मध्ये दुमदुमला विठू नामाचा गजर

Jul 18, 2024 - 12:54
 0
'नवनिर्माण हाय'मध्ये दुमदुमला विठू नामाचा गजर

रत्नागिरी : 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा'  या आरतीबरोबरच 'माऊली माऊली', ' विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला', 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' अशा विठूच्या जयघोषात आणि टाळ-चिपळ्यांच्या गजरात येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेचा परिसर दुमदुमला. निमित्त होते नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आयोजित आषाढी उत्सवाचे.

येथील नवनिर्माण हायमध्ये १६ जुलै आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उद्या असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त शाळेच्या जवळच आषाढी वारी काढण्यात आली. यात टायनी टॉट्स या पूर्व प्राथमिक विभागातील मुलांपासून बारावीपर्यंतची (सीबीएससी) सर्व मुले वारकरी संप्रदायातील वेशभूषा साकारून यात सहभागी झाले होते.

प्रारंभी वारी काढल्यानंतर या चिमुकल्या वैष्णवांनी शाळेच्या प्रांगणातच विठू माऊलीच्या नावाचा ठेका धरला आणि फुगड्या घालतानाच हरी नामाच्या गजराने शाळेचा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर सर्व मुलांनी सभागृहात वेगवेगळ्या गाण्यांवर, अभंगांवर नृत्याचे, भारुडाचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. श्लोक अळकुंटे आणि श्रेयांशी रुमडे या तिसरीच्या वर्गातील मुलांनी साकारलेली विठोबा आणि रखुमाईची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

या कार्यक्रमाला नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:24 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow