खेड : लोटे येथे महामार्गाच्या साईडपट्टीवर केले वृक्षरोपण

Jul 19, 2024 - 12:23
 0
खेड : लोटे येथे महामार्गाच्या साईडपट्टीवर केले वृक्षरोपण

लोटे : जुन्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा मोठी सावली देणारी झाडे होती. नवीन महामार्गाच्या कामासाठी ती झाडे तोडण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूंचा भाग उजाड झाला आहे. मात्र, महामार्गाचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येत आहेत; परंतु यामध्ये कोणतेही नियोजन नसून केवळ वृक्ष लागवडीचे सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहेत.

काही कोटी रुपये खर्च करून ही झाडे लावण्याची सुरुवात झाली आहे; परंतु लोटे येथे झाडे लावताना ती पूर्णतः साईडपट्टीवर काँक्रिट रस्त्यापासून अवघ्या दोन ते तीन फुटांच्या अंतरावर दाटीवाटीने लावण्यात आली आहेत. यामुळे एखादे वाहन महामार्गालगत वाहन बाजूला उभे करण्यास अडचण निर्माण होत आहे.

तसेच औद्योगिक वसाहत असल्यामुळे कारखान्यांमध्ये येणारे मोठमोठे कंटेनर असलेली वाहने महामार्गाच्या बाजूला साईडपट्टीवर उभी केली जातात, अशावेळी हे वाहनचालक अलीकडे या झाडांची काळजी न घेता ती गाडीखाली चिरडून टाकतात.

महामार्ग प्राधिकरणाने काँक्रिट रस्त्याखेरीज आणखी अतिरिक्त जागेचे संपादन केलेले आहे. मग पुरेशी जागा असताना योग्य अंतर ठेवून झाडे लावली असती तर किमान ५ ते ७ किलोमीटर ही झाडे पुरली असती आणि जगलीही असती. केवळ सोपस्कार करून कार्यभाग उरकला जात आहे. थोडक्यात, पैशाचा अपव्यय सुरू असल्याची ओरड येथील नगारिकांसह वाहनचालक करत आहेत.

वृक्ष लागवडीसाठी नियोजन हवे
याकडे शासनाने व महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देऊन योग्य नियोजन करीत झाडे लावावीत, जेणेकरून तापमानवाढ रोखण्यास मदत होईल आणि कोकणातील महामार्गाचे लोप पावलेले निसर्गसौंदर्य महामार्गाला पुन्हा प्राप्त होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow