MPSC Group C Recruitment : नोकरभरतीची गट-ब आणि गट-क ची पदं MPSC तर्फे भरणार, शासन निर्णय जारी

Jul 19, 2024 - 12:33
 0
MPSC Group C Recruitment : नोकरभरतीची गट-ब आणि गट-क ची पदं MPSC तर्फे भरणार, शासन निर्णय जारी

मुंबई : महाराष्ट्रातील नोकरभरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं गुरुवारी शासन निर्णय जारी केला आहे.

राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क ( वाहन चालक वगळून ) संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने एमपीएससीच्या कक्षेत आणणार, यासाठी पाच सदस्य समिती राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देखील गट क प्रवर्गातील पदं टप्प्या टप्प्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरली जातील अशी घोषणा केली होती.

राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून गट-ब आणि गट-क प्रवर्गातील पदांची भरती प्रक्रिया टप्प्या टप्प्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकजे देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. नोकरभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती. गट ब आणि गट क संवर्गातील पदे भरताना परीक्षांमध्ये अनेक वेळा गैरप्रकार आणि पेपर फुटीची प्रकरण समोर येत होती. यावेळी वारंवार या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाव्यात अशा प्रकारची मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शासन निर्णयानुसार गट ब अराजपत्रित आणि गट क ( वाहन चालक सोडून ) संवर्गातील पदभरती प्रक्रिया राबवताना या गटातील पदे टप्प्याटप्प्याने एमपीएससीच्या कक्षेत आणली जातील. सदर पदे टप्प्याटप्प्याने आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी तसेच एमपीएससी चे सक्षमीकरण करण्यासाठी त्यासोबतच आयोग आणि शासन यांच्यात समन्वय राखण्यासाठी सामान्य प्रशासन अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

सध्या सुरु असलेली प्रक्रिया खासगी कंपन्यांमार्फतच

आतापर्यंत ज्या संवर्गातील पदे टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांशी राज्य शासनाने करार करून त्यांच्यामार्फत ही पद भरती प्रक्रिया राबवली जात होती. त्या विभागात तातडीने पदभरती करायची आहे किंवा जिथे पदभरती प्रक्रिया सुरू आहे ती पदे शासनाने नेमलेल्या कंपनीद्वारेच भरती प्रक्रियेतून भरली जातील. ही प्रक्रिया करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत असेल.

दरम्यान, नोकर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारनं जारी केलेल्या शासन निर्णयाचं स्वागत केलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow