"आम्हाला चहापाणी नको, चांगला रस्ता द्या"; रखडलेल्या महामार्गामुळे चाकरमान्यांचे बेहाल..

Sep 10, 2024 - 10:25
 0
"आम्हाला चहापाणी नको, चांगला रस्ता द्या"; रखडलेल्या महामार्गामुळे चाकरमान्यांचे बेहाल..

◼️ *लांबलेल्या प्रवासामुळे शेजार्‍यांकडून बाप्पाची प्रतिष्ठापना

रत्नागिरी : गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाने यंदाही मुंबईतून कोकणला गेलेल्या चाकरमान्यांच्या गणेशोत्सवाचे अक्षरशः तीन तेरा वाजवले. 8 तासांचा हा प्रवास हा 15 ते 20 तासांवर जाऊन पोहोचला. 

परिणामी, असंख्य चाकरमान्यांना गणरायाची प्रतिष्ठापना साधता आली नाही. ‘गणपती घरात आणि चाकरमानी रस्त्यातच’ अशी विचित्र स्थिती चाकरमान्यांची महामार्गाने करून ठेवली. अनेक ठिकाणी तर दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनालाच ही मंडळी पोहोचली. यंदा चाकरमान्यांनी तशी 4 सप्टेंबरपासूनच गणपतीसाठी गावाची वाट धरली होती; मात्र बहुसंख्य चाकरमानी 6 तारखेला मुंबईतून गावाकडे निघाले. परंतु, महामार्गाचे रडगाणे पुन्हा आड आले. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आणि 7 तारखेला प्रतिष्ठापनेचा मुहूर्त टळला तरी ही मंडळी पोहोचलेली नव्हती.

कोकणातील चाकरमान्यांसाठी सरकारने मुंबईतून एसटी महामंडळाच्या 5 हजार गाड्या आणि 10-10 गणपती स्पेशल ट्रेनस् सोडल्या खर्‍या; परंतु या प्रचंड वाहनसंख्येला वाहून नेण्याची ताकद ना महामार्गात होती ना फक्त एक ट्रॅकच्या कोकण मार्गात! तब्बल 20 तासांचा प्रवास झाला आणि परतीच्या प्रवासाच्या कल्पनेनेही या चाकरमान्यांच्या अंगावर काटा उभा आहे.

दरवर्षी मुंबईकर चाकरमानी स्वत:च्या गाड्या घेऊन पुणे-कोल्हापूर मार्गे तळकोकणात यायचे. प्रवास थोडा लांबचा असला तरी रस्ता चांगला असल्यामुळे 11-12 तासांत चाकरमानी गणेशोत्सवाला गावात पोहोचायचे. गेले दीड दशक उभारण्यात येत असलेला मुंबई-गोवा महामार्ग आता दर गणेशोत्सवाला असाच नडतो आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी करून चाकरमान्यांना त्रास होणार नाही, असे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. खड्डे भरण्यात येऊन चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक होईल, असेही आश्वासन दिले गेले. त्यावर विश्वास ठेवला आणि चाकरमान्यांची फसगत झाली. परतीच्या महामार्गावर आजही ठिकठिकाणी खड्डेच खड्डे आहेत. विशेष करून आरवली ते लांजा या भागात संपूर्ण महामार्गच खड्यातून गेल्याचे दृष्य आहे.

ठिकठिकाणी डायव्हर्शन
तब्बल 5 हजार एसटी गाड्या मुंबईकर चाकरमान्यांना घेवून कोकणात निघाल्या, परंतु महामार्ग इतक्या गाड्या सामावू शकला नाही. एसटी बसेस, त्यात खाजगी बसेस आणि पुन्हा चाकरमान्यांच्या स्वत:च्या कार, ही सर्व वाहने खरे तर महामार्गावरून सुसाट जायला हवी होती. तसे झाले नाही. जागोजागी अर्धवट कामांमुळे या महामार्गाला वळणे दिलेली असल्याने ठिकठिकाणचे हे डायर्व्हशन आणि प्रचंड खड्डे वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरले. मुंबई ते चिपळूण अशा पाच-सहा तासाच्या प्रवासाला तब्बल 12 तास लागले. मुंबई ते कणकवली अशा नेहमीच्या दहा ते बारा तासाच्या प्रवासाला वीस-वीस तास लागले. या प्रवासात चाकरमान्यांचे खाणे-जेवणे आणि विश्रांतीचे किती हाल झाले असतील याची कल्पनाच न केलेली बरी.

रोहा ते महाड सहा तास
कणकवली तालुक्यातील खाजगी गाडी घेवून मुंबईहून आलेले चाकरमानी अनिकेत जेठे यांना तब्बल 18 तास लागले. रोहा ते महाड हे अंतर कापायलाच सहा तास लागले. जागोजागी असलेल्या डायर्व्हशनमुळे एसटी गाड्या पुढे सरकत नव्हत्या. शिवाय खड्डे होतेच. चिपळूण ते संगमेश्वर या 20 कि.मी.च्या अंतरातही वाहतूक कोंडी मोठी होतीच. रत्नागिरी ते पाली आणि लांज्यापर्यंत खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त गाड्या सोडल्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाली असे अनिकेत जेठे यांनी सांगितले. जाताना कोल्हापूर-पुणे मार्गे जाणेच बरे असेही ते आवर्जून म्हणाले.

शेजार्‍याकडून प्रतिष्ठापना
मुंबईकर चाकरमानी जेव्हा गावी यायचे नियोजन करतात तेव्हा जास्तीतजास्त बारा तासात तळकोकणात पोहोचू असा त्यांचा प्लॅन असतो. गावातील अनेक घरे तशी गणपती सणालाच उघडतात. गावी पोहोचल्यानंतर घरातील झाडलोट, मंडपीची सजावट आणि प्रत्यक्ष गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना हे सर्व युध्दपातळीवर आटोपले जाते. यावेळी मात्र लांबलेल्या प्रवासामुळे प्रतिष्ठापनेचा मूहूर्त आला तरी काहींना घर गाठता आले नव्हते. काहींनी गावात राहणार्या एखाद्या घरातील माणसाकडून कशीबशी सजावट करून घेतली. पण ज्यांचे गावी कुणीही नाही अशांसाठी शेजारधर्म धावून गेला. अगदी मुहूर्तावर प्रतिष्ठापना व्हावी म्हणून काहींनी शेजार्‍यांकडूनच बाप्पाची प्रतिष्ठापना करून घेतली.

‘परत-कोंडी’चा सामना
रविवारी दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन झाले. आणि परतीला निघालेल्या चाकरमाण्यांनाही ‘परत-कोंडी’ अडकून पडावले लागले. रविवारी रात्रीपासून महामार्गावर ठिकठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

"महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे आम्हाला खूपच मनःस्ताप सहन करावा लागला. ठिकठिकाणी आमचे चहापाणी देऊन स्वागत केले, परंतु आम्हाला ते नको. आम्हाला रस्ता चांगला द्या". दीपक साळवी, चाकरमानी

"महामार्गाचे काम पूर्ण होत नाही ही कोकणवासियांसाठी एक शोकांतिकाच आहे. राजकीय पक्ष आमच्याकडे मतांसाठी येतात आणि विकासाच्यावेळी मात्र घरातच बसतात."
संदेश कदम, चाकरमानी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 10-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow