मंडणगड : वडवली परिसरातील रस्त्यावर बिबट्यांचा मुक्त वावर

Jul 20, 2024 - 12:21
Jul 20, 2024 - 14:23
 0
मंडणगड : वडवली परिसरातील रस्त्यावर बिबट्यांचा मुक्त वावर

मंडणगड : तालुक्यातील देव्हारे या मुख्य गावापासून वडवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी भरदिवसा दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, याच भागात मोडणाऱ्या पाचरल परिसरात काही दिवसांत चार बकऱ्या मारल्याची माहिती पुढे येत आहे.

वनविभागाच्या दृष्टीने देव्हारे पंचक्रोशीचा परिसर हा घनदाट व बिबट्यांसाठी सुरक्षित अधिवास मानला गेला आहे. गतवर्षी वनविभागाने याच परिसरातून एका बिबट्यास पिंजऱ्यात पकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास सुरक्षित अधिवासात सोडले होते. अनेक वर्षांपासून त्याची वन्यजीवांचे मोजणी करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. त्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तालुक्यातील बिबट्यांची संख्या कोणासही माहिती नाहीं; मात्र बिबट्याचा वेळास ते देव्हारे परिसरात वावर सर्वाधिक दिसून आला. देव्हारे परिसर दाट वनराईचा असला तरी गेल्या काही वर्षापासून या परिसरात जमीन विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी क्षेत्रातील जमीन मालकीत जंगलतोड झाली आहे. ही बाब लक्षात घेता बिबट्याने मानवी वस्तीकडे मोर्चा वळवल्याने वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास राहिलेला आहे अथवा नाही याविषयी तालुकावासियांकडून भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अन्नाच्या शोधात बिबट्याने मानवी वस्तीत येऊन पशूधन व पाळीव प्राण्यांची शिकार केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे वनविभागाने या संदर्भात कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 20/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow