चिपळूण, खेडमध्ये शिरले पुराचे पाणी

Jul 15, 2024 - 11:25
 0
चिपळूण,  खेडमध्ये  शिरले पुराचे पाणी

रत्नागिरी :मागील तीन दिनसापासून जिल्हयात मुसळधार कोसळत असून रविवारीही धुवाधार पावसाने जिल्हयातील आठ प्रमुख नद्यांपैकी चार नद्या या इशारा पातळीवर वाहू लागल्या आहेत उर्वरित चार नद्यांची पाणी पातळीही इशारा पातळीनजीक आहे. खेडमध्ये जगबुडीने धोका पातळी ओलांडली असून या ठिकाणी दोनशेहून अधिक कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतरीत केले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, जिल्हयातील काही ग्रामीण मार्गावर पाणी आल्याने वाहतूक थांबण्यात आली होती. गुहागरमध्ये दुरुस्तीसाठी किना-यावर येणारी नौका बुडाली. यात खालाशी सुदैवाने बचावले आहेत.

समुद्राला सायंकाळी साडेचार वाजता भरतीची वेळ असल्याने सायंकाळी समुद्राचे पाणी खाडीत फुगल्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.

वस्तीत शिरले पाणी: २१६ जणांचे स्थलांतर
खेडमधील जगबुडी व नारंगी नद्यांचे पाणी वाडीवस्त्यांत शिरले होते. खेडमध्ये चिपळूण नाका, तळ्याचे वाकण परिसरातून १२५ तर खेड शहरातील सम्राटनगर, बाळवाडी येथून ९१ जणांना स्थलांतरीत करण्यात आले

दापोली-मंडणगड रस्त्यावर पालगड पवारवाडी येथे पुलावरुन पाणी गेल्याने सायंकाळी प्रशासनाकडून छोट्या वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली होती. चिपळूण शहरामध्ये सायंकाळी वाशिष्ठीचे पाणी शिरु लागले होते. चिपळूणात महामार्गाजवळील ओझरवाडी डोगरातील पाणी भेट गटारात न गेल्याने महामार्गावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. यामुळे महामर्गाशेजारी काही घरांमध्ये व दुकानांमध्येहि पाणी गेल्याने नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यात बाजारपेठत पुराचे पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे कोंद आंबेड, हिंगणी, करजुवे, धामणी, कसबा, फणसवणे या ग्रामीण भागात रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग बंद ठेवण्यात आले होते.

रत्नागिरी, लांजा व राजापूरमध्ये पाऊस थांबून थांबून पडत होता. मात्र नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली होती. राजापुरात कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत होती. चिपळूण शहर परिसरात शनिवारी (दि. १३) सायंकाळपासून सुरू इालेल्या जोरदार पावसामुळे रविवारी (दि.१४) सकाळी शहरातून जाणाऱ्या महामार्ग परिसरासत सखल भागात पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या त्यातच शहराच्या पूर्व पट्टपात म्हणजेच सह्याद्री खोऱ्यात जोरदार पाऊस पडत होता त्याचदरम्यान भरती सुरू झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून शहरातील शिव आणि वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. दुपारी ३:१५ च्या सुमारास वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली. परिणामी सतर्क झालेया प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणे अंतर्गत एनडीआरएफ पथकासाः पोलिस, नगर परिषद व महसूल विभागाच्या पथके तैनात ठेवण्यात आली.

चिपळुगात पुन्हा पाणी...
चिपळूण शहर परिसरातर शनिवारी सांयकाळपासून जोरदार पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली. परिणामी शनिवारी सायंकाळी शहरातील अनंत आईस फॅक्टरी परिसरासह वाचनालय परिसर आदी सखल भागात पाण्याचा निचरा न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. रविवारी सकाळी पावसाचा जोर कायम राहिल्याने या परिसरासह शहरातील महामार्ग भागात पाण्याचे जोरदार प्रवाह सुरू झाले. महामार्गावर पाग पॉवर हाऊस परिसरासह पोलिस वसाहत परिसरात तुंबलेले पाणी शिरले तर महामार्गावरून तुंबलेल्या पाण्याचा प्रवाह वेगाने वाहू लागला. दरम्यान, पावसाची संततधार सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. त्यातच भरतीची वेळ जुळून आली. दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे शिव व वाशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढली. तसेच शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यातच शहराच्या पूर्व पट्ट्यात म्हणजेच सह्याद्री खोऱ्यात दसपटी, कोळकेवाडी, शिरगाव, अलोरे, पोफळी अशा डोंगरभागात पावसाने चांगलाच जोर धरला होता. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन सर्व पाणी वाशिष्ठी व शिव नदीच्या माध्यमातून गोवळकोट खाडीकडे प्रवाहीत झाले. त्यामुळे शहरात तुंबलेल्या पाण्याचा निचरा अडथळा निर्माण झाला. पावसाचा सततचा वाढता जोर, पूर्वपट्ट्यात जोरदार पडणारा पाऊस व भरती परिणामी शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी पुराच्या पाण्यापासून सावध राहावे यासाठी न.प.ने दुपारी तीनच्या सुमारास इशारा भोंगा वाजवून सावध केले. वाशिष्ठी नदीतील वाढत जाणाऱ्या पाणी पातळीवर आपत्कालीन पथकाकडून लक्ष ठेवले जात होते. दुपारी ३:१५ च्या सुमारास पाच मी. अर्थात इशारा पातळी गाठली. त्यामुळे नदीचे पाणी नाईक कंपनी, बाजार पूल परिसरासह भार्गव पेठेत शिरले. पावसाचा जोर सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होता. दरम्यान, कोळकेवाडी धरणातून वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीपात्रात येणारे पाणी सकाळी १२:३० वाजल्यानंतर थांबविण्यात आले. नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ, जोरदार पाऊस, भरती व सखल भागात पाणी शिरणे यामुळे कोळकेवाडी धरणातील वीज टर्बाईन बंद ठेवून नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी सायंकाळी उशिरापर्यंत थांबविण्यात आले होते.

सामानाची सुरक्षितस्थळी हलवाहलव
रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, सकाळपासून पडलेल्या जोरदार पावसामुळे व भरतीच्या परिणामी शहरातील छत्रपती शिवाजी चौक (चिंचनाका) येथे पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहराच्या आजुबाजूच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी सुरक्षेचे उपाय म्हणून आपापले सामान सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली. तसेच चार वाजल्यानंतर दुकानातील व खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घरचा रस्ता धरला. ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांनी देखील घरी परतण्याची घाई सुरू केली. परिणामी बाजारपेठेत शुकशुकाट होता. पावसाचा परिणाम गुहागर-चिपळूण मार्गावरील बसफेऱ्यांवर देखील झाला. यामुळे बसफेऱ्या गुहागर बायपास मार्गे वळविण्यात आल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 15/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow