राजापूर : आडिवरे रस्त्याला वहाळाचे स्वरूप

Jul 23, 2024 - 12:34
 0
राजापूर : आडिवरे रस्त्याला वहाळाचे स्वरूप

नाटे : राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील रस्त्याची दुरवस्था झाली असून, अनेक अपघात घडत आहेत. पावसात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून, यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. या मार्गाची तत्काळ दुरस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

वाडापेठ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आडिवरे येथील श्री महाकाली देवस्थानच्या समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने आणि खड्डयाचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होत आहेत. श्री महाकाली देवस्थानच्या समोरील या रस्त्यावर दरवर्षी अशाच पद्धतीने मोठमोठे खड्डे पडत असून, तात्पुरती मलमपट्टी केली जाते. सागरी महामार्गावरील वाडापेठ एसटी स्टैंड ते भगवती मंदिर या तीनशे मीटरच्या रस्त्यासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर असून, यासाठी निधीही मंजूर झालेला आहे मात्र हे काम मागील तीन वर्षापासून रखडलेले आहे, असे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, या भागातील हे डांबरीकरण पूर्णतः वाहून गेल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात या भागात जांभा दगड टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न बांधकाम खात्याने केला होता; पण त्याचा काहीही उपयोग झालेला नसून या भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. पुढील आठ दिवसांत या रस्त्यासाठी ठोस उपाययोजना केली गेली नाही, तर सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वाडापेठ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री महाकालीचे देवस्थान असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक गावात येतात; मात्र देवस्थान समोरील या रस्त्याची दुरवस्था पाहून त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. - सुनील रुमडे, सरपंच, वाहापेठ


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow