संगमेश्वर : आरवली-माखजन रस्त्यावर पाणी

Jul 23, 2024 - 10:03
Jul 23, 2024 - 12:37
 0
संगमेश्वर : आरवली-माखजन रस्त्यावर पाणी

संगमेश्वर : सार्वजनिक बांधकाम विभागाने आरवली-माखजन रस्त्याच्या गटारांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई न केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे, त्याचा वाहतुकीस त्रास होत असून, रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडझुडपे तोडण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती वाहनचालकांमधून व्यक्त केली जात आहे. आरवली ते माखजन या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढत आहे. या रस्त्याच्या देखभालीकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यापूर्वी बाजूपट्टया जांभ्या दगडाने भरण्यात आल्या होत्या; मात्र बाजूपट्टीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्ताची गटारे साफ करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी आरवली देवील पाटणकर घर आणि माखजन येथील हुजरे यांच्या घरासमोर साचते, गुडघाभर पाणी तिथे जमा होत असल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. मोटारसायकल आणि छोट्या वाहनचालकांना जीव धोक्यात टाकून वाहने पाण्यातून चालवावी लागत आहेत. आरवली आणि माखजन येथील मोऱ्या साफ करण्याची गरज आहे; परंतु याकडे लक्ष देण्यास बांधकाम विभागाला वेळ नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडी वाढली असल्याने वळणावर वाहनचालकांना पुढून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे. बांधकाम विभागाने ही झाडी तोडावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. अपेक्षित दुरुस्ती होत नाही. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात; मात्र अपेक्षित दुरुस्ती होत नाही, असे पंचायत समितीचे माजी सदस्य जाकीर शेकासन यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील दोन वर्षांत आरवली-माखजन रस्त्यावर किती रुपये खर्च केला तसेच कोणती दुरुस्ती केली याबाबत जाहीर खुलासा करावा, अशी मागणी शेकासन यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 23-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow