संगमेश्वर : कुंभारखाणी बुद्रुक रस्त्यावर मोरी खचली; वाहतूक बंद

Jul 31, 2024 - 10:40
Jul 31, 2024 - 11:10
 0
संगमेश्वर : कुंभारखाणी बुद्रुक रस्त्यावर मोरी खचली; वाहतूक बंद

सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील आरवली कुंभारखाणी बुद्रक रस्त्यावरील कुंभारखाणी बुद्रुक हद्दीतील चर्मकारवाडी येथील मोरीला सोमवारी अचानक भगदाड पडले. मोरीवरील रस्ता आतून पोकळ झाला आहे. सोमवारपासून या मार्गावरील वाहतूक बंद पडली. पोलिसपाटील राकेश सुर्वे यांनी तत्काळ देवरुख येथील सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवून घटनेची माहिती दिली.

खात्याचे कनिष्ठ अभियंता बोरसे यांनी मोरीची पाहणी करून मोरी दुरुस्ती करण्याचे काम तत्काळ हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले आहे. या मार्गावरील अवजड वाहतूक बंद केली आहे. या दहा किमी लांबीच्या रस्त्यावरील मोऱ्या व बाजूपट्टया ठिकठिकाणी खचल्या आहेत. हा रस्ता नदीकाठावरून जात असल्याने रस्ता नदीच्या बाजूने तुटत चालला आहे. रस्त्याला नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीचे काम अर्धवट झाले आहे. तसेच मोरीच्या व रस्त्याच्या बाजूचा भराव निघून गेल्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे.

रस्त्याच्या बाजूने वाहणारी नदी गाळाने भरली आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली की, मोऱ्या पाण्याखाली जातात. नदीतील गाळ काढण्याची गरज आहे. मोन्ऱ्या बनवत असताना सिंमेट, खडीऐवजी डांबराचा वापर होत असल्याने मोऱ्या खचतात. याबाबत आधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. - संतोष थेराडे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी

हा मार्ग अतिशय धोकादायक बनला आहे. या मार्गावर झालेली कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकेल. - विकास सुर्वे, माजी उपसभापती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow