मंडणगड : आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Aug 1, 2024 - 12:54
 0
मंडणगड  : आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गाची  अधिकाऱ्यांकडून पाहणी

मंडणगड : आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांचा पाढा वाचल्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने बुधवारी (ता. ३१) प्रत्यक्ष घटनास्थळांची पाहणी केली, तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधत नियमित येणाऱ्या समस्यांचा अधिकाऱ्यांनी अहवाल तयार केला आहे. तसेच त्या समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेला दिले.

मंडणगड तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात २२ जुलैला दिलेल्या निवेदनानुसार, झालेल्या सभेत शेतकऱ्यांनी समस्या व अडचणींचा पाढाच वाचला. त्या समस्या त्वरित सोडवा, अशा सूचना तहसीलदार श्रीधर गालीपिल्ले यांनी दिल्या आहेत. शेतकरी संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत मंडणगड तहसील कार्यालयात ३० जुलैला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, शेतकरी संघटना शिष्टमंडळ व कामाचे ठेकेदार अक्षय कन्स्टक्शनचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीला तहसीलदार श्रीधर गालीपिल्ले शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश घडवले, कौस्तुभ जोशी, अविनाश दळवी, सचिन माळी, अनंत केंद्रे, शब्बीर मांडलेकर, अस्मिता केंद्रे, गजानन जंगम आनंद नारकर, सुधाकर घोसाळकर प्राधिकरणाचे अभियंता अभिजित झेडे, राजमाने उपस्थित होते. सावळा शेतकरी संघटनेने मांडलेल्या विविध समस्या लक्षात घेऊन आज पाचरळ, पाले, तुळशी, माहु तळशी घाट, शेनाळे गाव, शेनाळे घाट, चिंचाळी ते म्हाप्रळ व मंडणगड येथील समस्याग्रस्त ठिकाणी संयुक्त पाहणी करण्यात आली. गावागावांत बसस्टॉप अभावी होणारी गैरसोय, रस्त्याची बाजूपट्टीची दुरवस्था, गावांना जोडणाऱ्या रस्त्याची बिकट झालेली स्थिती, घाटातील दरडप्रवण ठिकाणे, रस्त्याला पडलेले खड्डे, चुकीच्या पद्धतीने गटारे तयार करण्यात आल्याने पाण्याचा न होणारा निचरा, सूचना व नामफलक अशा समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. वस्तुस्थितीची नोंद करून ती कामे तातडीने पूर्ण करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सभेमध्ये समस्या व गाऱ्हाणे न मांडता शेतकरी संघटनेने प्रत्यक्षात या समस्या संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देत समाजहिताचे काम केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देऊन घेण्यात आलेल्या भूमिकेची दखल महसूल विभागाने घेत संबंधित यंत्रणांची सभा आयोजित करून प्रत्यक्ष जागेवर जात समस्यांची पाहणी केली. गणेशोत्सवापूर्वी सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासनही दिले; मात्र कामे वेळेत पूर्ण न केल्यास शेतकरी संघटना ठिय्या आंदोलनाच्या भूमिकेवर कायम आहे. -रमेश घडवले, अध्यक्ष, शेतकरी संघटना


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:20 PM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow