Ratnagiri : किनारपट्टी भागात वादळी वारे; मासेमारीच्या नव्या हंगामाचा आजचा मुहूर्त हुकण्याची शक्यता

Aug 1, 2024 - 10:54
Aug 1, 2024 - 12:54
 0
Ratnagiri : किनारपट्टी भागात वादळी वारे; मासेमारीच्या नव्या हंगामाचा आजचा मुहूर्त हुकण्याची शक्यता

रत्नागिरी : कोकणात मासेमारी हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. मात्र किनारपट्टीवरील भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. मंगळवारी रात्री देखील किनारपट्टीसह अनेक भागात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यानी हजेरी लावली. त्यामुळे १ ऑगस्टचा मासेमारीचा मुहूर्त टळण्याची शक्यताच अधिक आहे.

मागील दोन महिने कोकण किनारपट्टीवर मासेमारी बंद होती. त्यामुळे मच्छिमारांनी त्यांच्या बोटी किनारपट्टीला शाकारून ठेवल्या होत्या. मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलैला संपुष्टात आला आहे. त्यामुळे मासेमारीच्या नव्या हंगामाची मच्छीमार सुरुवात करणार आहेत. यासाठी लगबग सुरु झाली आहे. बोटीची डागडुजी आणि रंगरंगोटी आणि मच्छीमार जाळ्यांची देखभाल दुरुस्तीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. डीझेल, बर्फ, अन्न धान्य याची जमवाजमव सध्या सुरू आहे. किनाऱ्यावर जाळी विणणे, होड्यांना तेल लावणे, बोर्ड रंगवणे या सारखी कामे सुरू आहेत.

मात्र जिल्ह्यातील पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. दोन दिवसांनी गटारी अमावस्या येत आहे. गटारी अमावस्येच्या पार्श्भूमीवर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच किनारपट्टीवरील भागात सोसाट्याचे वारे वाहत आहेत. पावसाचा जोरही कायम आहे. त्यामुळे मच्छीमार बोटी समुद्रात उतरवाव्यात अथवा नाही याबाबत साशंक आहेत. त्यामुळे अनेक मच्छीमारांनी अद्याप आपल्या बोटी पाण्यात उतरवेल्या नाहीत. त्यामुळे १ ऑगस्टचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे. अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मासेमारी नोकानी समुद्रावर स्वार होण्याची तयारी पूर्ण केली आहे.

दरवर्षी समुद्रात भरपुर मच्छी मिळू दे आणि नुकसान टळू दे अशी मनोभावे प्रार्थना करून, तसेच मुहूर्त काढून, पुजा अर्चा करून मासेमारी होड्या समुद्रात सोडल्या जातात. काही जण नारळी पोर्णिमेनंतर आपल्या बोटी पाण्यात उतरवत असतात. त्यामुळे यंदा मोजक्या बोटीच १ तारखेला मासेमारीला जातील अशी शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 01-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow