चिपळूण : तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच संघटनेच्या विरोधानंतर वाचणार लाखो रुपये

Jun 4, 2024 - 09:41
 0
चिपळूण : तालुक्यातील  ग्रामपंचायतीचे  सरपंच संघटनेच्या  विरोधानंतर  वाचणार लाखो रुपये

चिपळूण : शिव स्वराज्य दिन ६ जून रोजी साजरा करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्वराज्य गुढी उभारतानाच प्रत्येक शासकीय कार्यालयात स्वराज्य प्रतिमा लावण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तालुक्यात ही प्रतिमा ४००० रुपये दराने घेण्याचा घाट घातला गेला. त्यावर सरपंच संघटनेने यावर आक्षेप घेतल्याने अनेक ग्रामपंचायतींनी संबंधितांचा आदेश धुडकावला.

चिपळूणला स्वराज्य प्रतिमा पुरवठा करणाऱ्या कराड येथील संबंधित पुरवठादाराने खेड आणि संगमेश्वर तालुक्यातही ४००० रुपये दराने प्रतिमा दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, तर दापोली तालुक्यात हीच प्रतिमा ३५०० रुपये दराने घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे खरेदीबाबत चिपळूणसाठी झालेल्या जबरदस्तीची खेड, संगमेश्वर आणि दापोली तालुक्यासही लागण झाली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक शासकीय कार्यालयात शिव स्वराज्य दिन साजरा केला जात आहे. स्वराज्य गुढी उभारून हा दिन साजरा केला जात असतानाच यावर्षी स्वराज्य प्रतिमा व बोधचिन्ह शासकीय कार्यालयात लावण्याची सूचना शासनाने केली. त्या आधारे प्रथमतः स्वराज्य प्रतिमा खरेदी करण्यासाठी जिल्हाबाहेरील एकच पुरवठादार शोधण्यात आल्या. संबंधित पुरवठादार हा एका अधिकाऱ्यांचा जवळचा असल्याने चढ्या दराने प्रतिमा खरेदी करण्याचा अलिखीत फतवा ग्रामपंचायतीना काढण्यात आला. मात्र त्यावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेतला.

चिपळुणातील बाजारपेठेत ही प्रतिमा पाचशे ते हजार रुपये दराने मिळत असताना चढ्या दराने खरेदीची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरपंच संघटनेने केलेल्या आवाहनास पाचशे ते एक हजार रूपये दराने काही ग्रामपंचायतीनी स्वराज्य प्रतिमा घेतल्याची माहिती आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना दुखवायचे कसे, अशी भूमिका घेणाऱ्या ग्रामपंचायतींनी ४ हजार रुपये दराने तीच प्रतिमा घेतली आहे. दरम्यान, चिपळूण तालुक्यास पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने जिल्ह्यातील खेड, संगमेश्वर तालुक्यासही याच दराने स्वराज्य प्रतिमा दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, तर दापोली तालुक्यात मात्र हीच प्रतिमा ३५०० रुपये दराने देण्याचे ठरले आहे. चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि दापोली तालुक्यात तालुकास्तरावरच खरेदीचा निर्णय झाला.

चिपळूण तालुक्यात प्रथम ठरल्यानंतर उर्वरित तिन तालुक्यांना या ठेकेदारास जोडून देण्यात आल्याची चर्चा आहे. स्थानिक बाजारपेठेत ५०० ते १००० रुपयांस स्वराज्य प्रतिमा उपलब्ध होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर लाखोंच्या होणाऱ्या गैरव्यहारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेकडून या साऱ्या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलीकडच्या काळात पंचायत समित्यांमध्ये तालुकास्तरावरच सेंट्रलाईज खरेदीची पद्धत बळावली आहे. संबंधित अधिकारी पुरवठादार शोधतात आणि त्याच्याकडूनच खरेदी करण्याचा अलिखीत संदेश ग्रामपंचायतीना देतात. काही वर्षापूर्वी खेड तालुक्यात याच पद्धतीने खरेदी झालेले सौर पथदिवे प्रकरण अधिवेशनात गाजले. 

कमिशनपोटी जेनडी रक्कम संबंधितांना मिळाली. त्याच्या पाचपटीने शासनाकडे ती भरावी लागली, शिवाय एक वेतनवाढ देखील रोखण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी पुन्हा एकच ठेकेदार निवडून व्हिलचेअर व सॅनिटरी डिसपोझल मशिन ग्रामपंचायतींना पुरवण्यात आल्या, पूर्वीचा अनुभव असतानाही खेड तालुक्याने सौरदिव्यातून कोणताच बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे.

वस्तू खरेदी बाबतचा अधिकार ग्रामपंचायतींचा आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप योग्य नाही. त्यांच्या सूचना अंमलात आणल्या जातील, चिपळूणात स्वराज्य प्रतिमेबाबत सरपंच संघटनेने घेतलेल्या निर्णयामुळे तालुक्याचे ४ लाख रूपये वाचले आहेत. ग्रामपंचायतींना आयत्यावेळी ग्रामनिधीतून विविध उपक्रम घेण्यास सुचवले जाते. त्यासाठी शासनानेच निधीची तरतूद करावी. - योगेश शिर्के, अध्यक्ष सरपंच संघटना, चिपळूण तालुका.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:53 AM 04/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow