रत्नागिरी : गावागावांत कारखाने निर्माण करण्याबाबत प्रयत्न व्हावेत - जि.प. सीईओ कीर्ती किरण पुजार

Aug 1, 2024 - 16:03
 0
रत्नागिरी : गावागावांत कारखाने निर्माण करण्याबाबत प्रयत्न व्हावेत - जि.प. सीईओ कीर्ती किरण पुजार

रत्नागिरी : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावांमध्ये छोटे उद्योजक तयार झाले आहेत. या सर्व योजनांचे रूपांतर करून एकत्रितपणे गावागावात कारखाने निर्माण करता येतील का, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी लवकरच कार्यशाळा घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारचे धोरणे आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागृता वाढविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे 'इग्नाइट महाराष्ट्र' या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवारी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पुजार बोलत होते.

ते म्हणाले, इग्नाइटसारख्या कार्यशाळेतून उद्योजकांना विविध विभागांची चांगली माहिती मिळणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून बँकर्स, विविध विभागांचे प्रतिनिधी, उद्योजक यांचा चांगला संवाद घडून येणार आहे. सीएमईजीपी, पीएमईजीपीसारख्या योजनांचे आपल्या जिल्ह्यामध्ये उत्तम काम सुरू आहे. जिल्ह्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. एमएसईएमईमध्ये आपल्या जिल्ह्यात ५२ हजार उद्योग सुरू आहेत. देशाच्या जीडीपीमध्ये त्यांचा मोठा सहभाग ठरत आहे.

टुरिस्ट हाऊसबोट सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील महिलांना केरळ येथे अभ्यासासाठी पाठविण्यात आले होते. त्याचबरोबर २० महिलांना केरळ येथे काथ्या उद्योगासाठी पाठविण्यात आले होते. आपल्या जिल्ह्यामध्ये लवकरच ५ टुरिस्ट बोट सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सहसंचालक श्रीमती शिरसाट म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, हा या इग्नाइट कार्यशाळेचा एकमेव उद्देश आहे. या कार्यशाळेमध्ये विविध तज्ज्ञ त्यावर मार्गदर्शन करणार आहेत. उत्पादित झालेल्या मालाची निर्यात करण्यासाठी कोणता देश बाजारपेठ मिळवून देऊ शकतो याची माहिती मिळेल. राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट समिट घेतले आहे. कोकण विभागात ४१६ सामंजस्य करार झाले आहेत. त्यातील ६१ रत्नागिरीसाठी आहेत. त्या माध्यमातून १४०० कोटीची गुंतवणूक होऊन ५३८३ रोजगार निर्मिती होणार आहे.

उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाट, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, मैत्रीचे समन्वय अधिकारी किशोर गिरोल्ला, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या रिशु मिश्रा, सीडीबीचे मनोज डिंगरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, गजानन करमरकर आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थी संजीवनी कुरतडकर, करुणा सागवेकर आणि शमिका कुंभवडेकर या तिघींना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणभर यांनी सर्वांचे प्रस्ताविक केले. व्यवस्थापक हरिभाऊ आंधळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित गोडबोले यांनी केले. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:32 01-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow