राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Aug 3, 2024 - 16:17
 0
राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

मुंबई : आज सकाळी पहिल्यांदा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यांच्या भेटीत मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता यासह आधी विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाकरे यांच्या भेटीनंतर काही वेळातच वर्षा बंदल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटी घेतली आहे. या भेटीचे कारण अजूनही समोर आलेले नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आज मुख्यमंत्री शिंदे यांची पाठोपाठ दोन बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. खासदार शरद पवार या भेटीत मराठा आरक्षणासह राज्यातील अन्य विषयावर चर्चा करतील असं बोललं जात आहे. शरद पवार दुपारी २ वाजता वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आठवड्याभरात ही दुसरी भेट आहे. या आधी २२ जुलैला भेट घेतली होती.

शरद पवार यांनी २२ जुलै दिवशी घेतलेल्या भेटीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय होता. यासोबतच दूध दराचाही प्रश्न, विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला कर्ज न देणे हा विषय होता. शरद पवार मुख्यमंत्री भेटीत कुणाच्या ही कारखान्यावर अन्याय होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, आता आजची भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे याची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

मनसेच्या शिष्टमंडळामध्ये बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या भेटीदरम्यान, उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या झाली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे समजते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 03-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow