कोकण किनारपट्टी भागात श्रावण सरी जोरदार बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

Aug 5, 2024 - 09:50
Aug 5, 2024 - 09:52
 0
कोकण किनारपट्टी भागात श्रावण सरी जोरदार बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

रत्नागिरी : श्रावणाच्या पूर्व संध्येला सरीवर असलेला पाऊस श्रावणाच्या प्रारंभापासूनच कोकण किनारपट्टी भागात जोरदार कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

अरबी सागरातील कमी दाबाचा पट्टा आणि त्याला चक्रीय वाऱ्याच्या साथीच्या प्रभावाखाली कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यासहित घाटमाथ्यावर पावसासाठी अनुकूलता निर्माण झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 

दरम्यान, शनिवारी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात २५.७१ मि.मी. च्या सरासरीने २३१.४० मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १ ऑगस्टपासून पाऊस पुन्हा सक्रीय झाला. गेल्या गुरूवारी पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अधुनमधून विश्रांती घेत सरींनी हजेरी लावली होती. त्यामुळे खेडमधील जगबुडी नदीचे पात्र इशारा पातळीवर होते. मात्र, आता पावसाचा जोर ओसरल्याने जगबुडीतील जलस्तर नियंत्रणात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६४९.३३ मिलीमीटर सरासरीने एकूण २३ हजार ८४४ मि.मी पाऊस झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ७८.७५ टक्के पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी आला आहे. शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. शनिवारी दुपारी पावसाने उसंत घेतली होती. मात्र, मध्येच जोरदार सरींची हजेरी लागत होती. दुपार नंतर पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली होती. थोडीशी उघडीप दिल्याने सौम्य उन्हामुळे वातावरण हलके कोरडे झाले. मात्र, पुन्हा सायंकाळी जोरदार सरी पडल्या. दरम्यान, शनिवारच्या नोंदीनुसार मंडणगडमध्ये ३१ मि.मी, दापोली २५.५०, खेड ४४.९०, गुहागर १३.२०, चिपळूण १८, संगमेश्वर २९.९०, रत्नागिरी २२, लांजा आणि राजापूर अनुक्रमे २४.८०९ आणि २२.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात पावसाची ७५ टक्के वाटचाल पूर्ण झाली. पावसाने शनिवारपर्यंत जिल्ह्यात ७८ टक्के वाटचाल पुर्ण केली. काही भागात पावसाने उघडीपही दिली. रत्नागिरी शहर आणि ग्रामीण परिससरात सकाळी पाऊस जोरदार झाला तर शनिवारी दुपारपर्यंत मळभी वातावरण होते. त्या नंतर सायंकाळी पुन्हा जोरदार सरी झाल्या.

अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे
मुसळधार पावसाचा रेड अलर्ट: पुणे, सातारा. 
जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्यम पावसाचा यलो अलर्ट पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया. 
विजासह जोरदार पावसाचा यलो अलर्ट : नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ आणि नागपूर.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow