Maharashtra Rain : कोकणात मुसळधार पाऊस, रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट, प्रशासन सतर्क

Jul 15, 2024 - 10:30
 0
Maharashtra Rain : कोकणात मुसळधार पाऊस, रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट, प्रशासन सतर्क

मुंबई: राज्यभरात विशेषतः कोकणामध्ये दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट असून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, सांगली, सोलापूरला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

रत्नागिरीत अनेक गावांत सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात कोंड, आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर पाणी भरलंय. त्यामुळे या भागांमधली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरीतील खेड-दिवाणखवटी येथे नदीला पूर आला असून सात गावांचा संपर्क तुटला आहे. गणेशवाडीतील सात वाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

रायगडमध्ये नद्यांच्या पातळीत वाढ

रायगड जिल्ह्यात शनिवारी रात्रभरापासून अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. रोहा शहरातील कुंडलिका नदीवर असणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी जाऊ लागल्यानं हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातल्या महाड आणि पोलादपूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. जोरदार पावसामुळं नद्या नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. सावित्री नदी दुथडी भरुन वाहत असून पावसाचा जोर पुढील काही तास कायम राहिला तर नदीला पूर येण्याची आहे. त्यामुळं आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफची टीमदेखील सावित्री नदीच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहे.

संगमेश्वरच्या बाजारपेठेत पाणी

संगमेश्वरमधील गड नदीला पूर आला असून पुराचं पाणी संगमेश्वरमधील बाजारपेठेत गेलं आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिसरातील शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. चिपळूण शहरात वाशिष्टी नदीचे पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून वाशिष्टी नदीने धोक्याची पातळी ओलांडली . नाईक कंपनी परिसरात बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून चिपळूणमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आहे, तर NDRF ची टीम शहरात तैनात करण्यात आली आहे. चिपळूण नगरपालिका प्रशासनाकडून व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे.

संगमेश्वर तालुक्यात कोंड आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात जि. प. रस्त्यावर पाणी भरलेले असल्याने सदरच्या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खाडी पट्टा विभागाचा खेड तालुक्याशी संपर्क तुटला

खेड तालुक्याला बहिरवली व खाडीपट्टा विभागाचे जोडणारा देवणे पूल रविवारी दिवसभर कोसळणाऱ्या संततदार पावसामुळे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड शहरातून देवने पुलाकडे जाणार रस्ता हा अगोदरच पाण्याखाली गेलेला असून नारंगी नदीचे पाणी देवडे पुराला घासून वाहत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प असून याला पर्यायी असणारा खेड भैरवली हा मार्ग देखील सुसरी नंबर एक येथील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे .

भिवंडीमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं

मुसळधार पावसाचा फटका भिवंडी शहरासह ग्रामीण भागालाही बसला आहे खाडीपार परिसरात 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं असून अनेक घरांमध्येही पाणी शिरलं. तीन बत्ती, भाजी मार्केट, ईदगाह रोड, खाडीपार परिसरातही पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलं. कामवारी नदीच्या पाण्यात जीव धोक्यात घालून काही तरुणांनी हुल्लडबाजी केली.

कल्याण परिसरातही पावसाची रिपरिप सुरु आहे. उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं कल्याण-नगर मार्गावरचा रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नगरकडून कल्याणला येण्यासाठी गोवेली-टिटवाळा मार्गे प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.

मुंबई गोवा महामार्ग ठप्प, बोरघर येथे आले महामार्गावर पाणी

रविवारी रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुंबई गोवा महामार्ग देखील बंद झाला आहे. महामार्गावरील बोरघर बस स्टॉप येथे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरीही काही वाहन चालक धाडस करून स्वतःचा इतरांचा जीव धोक्यात घालून या पाण्यातून वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

महामार्गालगत असणाऱ्या नदीने सकाळपासूनच रौद्ररूप धारण केले होते. यामुळे महामार्ग शेजारील असणाऱ्या गावांमध्ये जाणारे बरेचसे फुल सकाळपासूनच पाण्याखाली गेलेले पाहावयास मिळत आहेत पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबई गोवा महामार्ग देखील पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow