महाराष्ट्रात मासळीची टंचाई

Aug 5, 2024 - 15:03
Aug 5, 2024 - 15:05
 0
महाराष्ट्रात मासळीची टंचाई

मुंबई : हवामान खात्याचा अंदाज चुकल्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ आणि गोव्यातील एकही नौका मासेमारीसाठी जाऊ न शकल्याने महाराष्ट्रात मासळी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गटारीनिमित्त सुरमई, पापलेट, बोंबील आणि हलव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मत्स्यप्रेमींचा अपेक्षाभंग झाला आहे.

मुंबई हे सागरी मासे विक्रीचे प्रमुख आगार आहे. निर्यात योग्य मासे वगळता किनाऱ्यालगतच्या सर्व राज्यांतील मासे मुंबईत विक्रीसाठी आणले जातात. यासाठी महाराष्ट्रातून मासेमारीसाठी कधी परवानगी दिली जाते, याकडे शेजारच्या राज्यांचे लक्ष लागलेले असते. यंदा हवामान खात्याने प्रमुख राज्यांना मत्स्यमारीसाठी १ ऑगस्टचा मुहूर्त दिला होता, तर गुजरातला १५ ऑगस्टपासून मुभा दिली होती. परंतु, वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे समुद्र खवळला आहे. लाटा उसळत असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोव्यातील एकही नौका मासेमारीसाठी समुद्रात गेली नाही.

मुंबई शहर आणि उपनगरात ४ हजार ५०० तर राज्यात ९ हजार ३०० नौका आहेत. या सर्व नौका १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी जाणार होत्या, त्यानुसार सर्व मच्छीमार संस्थांना राज्य सरकारने डिझेल पुरविले होते. परंतु वातावरणातील बदलामुळे मुंबईतील ससून डॉक, भाऊचा धक्का आणि वेसावा बंदराच्या किनाऱ्यावरून एकही नौका समुद्रात जाऊ शकली नाही. मागील तीन दिवसांपासून येथील नौका किनाऱ्यावर उभ्या आहेत. हीच परिस्थिती शेजारच्या अन्य राज्यांची आहे, अशी माहिती केंद्रीय मत्स्य बोडर्डाचे सदस्य रामदास संधे यांनी दिली.

मासेमारीसाठी समुद्रात गेलेली नौका किमान आठवडा ते पंधरवड्यात परत येते. परंतु, यापुढील एक आठवडा तरी मासेमारीसाठी नौका समुद्रात जाण्याची शक्यता धुसर झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow