जनतेचा आग्रहनामा घेऊन 'भारत जोडो'चे काम करणार : उल्का महाजन

Aug 6, 2024 - 10:30
Aug 6, 2024 - 15:31
 0
जनतेचा आग्रहनामा घेऊन 'भारत जोडो'चे काम करणार : उल्का महाजन

चिपळूण : भारत जोडो अभियानने लोकसभा निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, मागच्या वेळचे अनुभव लक्षात घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत आपण अधिक प्रभावी भूमिका बजावणे आवश्यक आहे. या अनुषंगाने अभियानने जनतेचा 'जाहीरनामा' नव्हे तर, 'आग्रहनामा' तयार केला आहे. संपूर्ण संविधान आणि खरी लोकशाही अंमलात यावी, असे या आग्रहनाम्याचे अंतिम लक्ष्य आहे, असे भारत जोडोच्या महाराष्ट्र समन्वयक उल्का महाजन यांनी सांगितले.

भारत जोडो अभियानची रत्नागिरी जिल्हा पातळीवरील कार्यकत्यांची महत्त्वाची बैठक शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनमध्ये झाली. या बैठकीसाठी भारत जोडोच्या महाराष्ट्र समन्वयक उल्का महाजन या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. भारत जोडो अभियानचे चिपळूण तालुका अध्यक्ष राजन इंदुलकर यांनी बैठकीची रुपरेषा मांडली. भारत जोडो आंदोलन देशभरात कार्यरत असून भारताच्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही आणि समाजवाद या मूल्यांचे जतन व्हावे यासाठी हे आंदोलन कार्यरत आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील अनुभव आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबाबतचे अनुभव मांडले.

जिल्हा समन्वय समितीची स्थापना
भारत जोडो अभियानच्या पुढील वाटचालीसाठी रत्नागिरी जिल्हास्तरिय समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समितीत राजन इंदुलकर, निखिल भोसले चिपळूण, युयुत्सु आर्ते, विलास कोळपे संगमेश्वर, माधव शेट्ये, सचिन तोडणकर दापोली, पंकज दळवी, सुदेश हडकर गुहागर, राजेश समेळ, गणेश बिलार मंडणगड यांची निवड करण्यात आली. इतर तालुक्यातील प्रतिनिधींची निवड पुढील बैठकीत करण्याचा निर्णय यावेळी झाला.

बैठकीसमोर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मांडणी करताना उल्का महाजन यांनी राज्यभरातील परिस्थितीचा गोषवारा घेतला. येत्या विधानसभा निवडणुकीत हा आग्रहनामा समोर धरून प्रभावीपणे काम करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. बैठकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, संगमेश्वर या तालुक्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते, यामध्ये प्रामुख्याने प्रा. विनायक होमकळस, टी. डी. पवार, सचिन मोहिते, शरयू इंदुलकर, डॉ. रेहमान जबले, अशोक भुस्कुटे यांचा समावेश होता. सचिन मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले. उपस्थितांचे आभार मानून या बैठकीची सांगता करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 06/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow