Paris Olympic 2024 : भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पुन्हा एकदा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये

Aug 6, 2024 - 15:31
 0
Paris Olympic 2024 : भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पुन्हा एकदा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा नीरज चोप्रा पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या फायनलचे तिकीट मिळवण्यात त्याने यश मिळवले.

मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत ८४ मीटर भाला फेकल्यास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. हे अंतर गाठणारा खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतो. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे तो आता सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदकाला गवसणी घालतो का याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे. ८ तारखेला नीरज पदकासाठी मैदानात असेल.

भारतीय ॲथलेटिक्स विश्वाला सोनेरी दिवसांची अनुभूती देणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा नवे कीर्तिमान रचण्यासाठी ८ तारखेला मैदानात उतरेल. टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याबरोबरच १४० कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे यावेळी नीरजच्या खांद्यावर असेल. तसेच त्याच्यासमोरचे आव्हान काहीसे कठीण असल्याचे बोलले जात आहे. कारण गेल्या काही काळापासून दुखापतींचा ससेमिरा नीरजच्या मागे लागला आहे. आज, मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. या फेरीत पहिल्याच प्रयत्नात नीरजने लक्ष्यापेक्षा ४ मीटर लांब भाला फेकला अन् फायनलमध्ये प्रवेश मिळवला. मागील काही कालावधीपासून नीरजने अनेकदा दुखापतीचा सामना केला.

नीरज अन् दुखापत
दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने ८८.३६ मीटर भाला फेकला होता.
त्यानंतर खापतीमुळे ओस्ट्राव्हा येथील गोल्डन स्पाईक स्पर्धेत तो सहभागी झाला नाही.
जूनमध्ये फिनलँडला झालेल्या पावो नुरमी स्पर्धेमध्ये ८५.९७ मीटर भाला फेकत नीरजने सुवर्ण पदक पटकावले.
पुन्हा दुखापतीमुळे ७ जुलैला झालेल्या पॅरिस डायमंड लीगमधून त्याने माघार घेतली.

ऑलिम्पिकच्या इतिहासात सलग दोन सुवर्ण पदके जिंकणारे भालाफेकपटू

एरिक लेमिंग, स्वीडन (१९०८, १९१२)

जोन्नी मायरा, फिनलँड (१९२०, १९२४)

जान जेलेंजी, झेक प्रजासत्ताक (१९९२, १९९६)

आंद्रीयास टी, नॉर्वे (२००४, २००८)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 06-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow