ती एका विजेत्याप्रमाणे पुनरागमन करेल; विनेशच्या अपात्रेवर अमित शाहांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सुवर्णपदकाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) वजन वाढल्याचे कारण देत स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले.
अमित शाह म्हणाले की, "विनेश फोगट ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यामुळे कोट्यवधी भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. पण, एका विश्वविजेत्या पैलवानाचा पराभव करुन तिने तिची कारकीर्द चमकावली आहे. हा धक्का तिच्या कारकीर्दीतील एक अपवाद आहे, ज्यातून ती एका विजेत्याप्रमाणे पुनरागमन करेल, याची मला खात्री आहे. आमच्या शुभेच्छा आणि पाठींबा सदैव तिच्यासोबत असतील," असे ट्विट शाह यांनी केले.
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
विनेशवर झालेल्या अपात्रतेच्या कारवाईनंतर पीएम मोदींनी तिच्यासाठी ट्विट केले. ते म्हणाले, "विनेश, तू मोठी चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणा आहात. आजचा भारताला बसलेला धक्का दु:खदायक आहे. मला झालेले दु:ख मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या निर्णयाने साऱ्यांनाच प्रचंड निराशा झाली आहे. पण, मला माहित आहे की तू फायटर आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. दमदार पुनरागमन कर! आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत," असे धीर देणारे ट्विट मोदींनी केले.
पंतप्रधानांची IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या धक्क्यानंतर भारताकडे कोणकोणते पर्याय आहेत, याबद्दल प्रथम माहिती घेतली. विनेश प्रकरणात सर्व पर्यायांचा शोध घेण्याची विनंती मोदींनी पीटी उषा यांच्याकडे केली.
राहूल गांधी काय म्हणाले?
"विश्वविजेत्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची शान विनेश फोगटला तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले, हे दुर्दैवी आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना या निर्णयाला जोरदार आव्हान देईल आणि देशाच्या कन्येला न्याय देईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. विनेश हिम्मत गमावणारी नाही, ती आणखी मजबूतपणे रिंगणात परतेल असा आम्हाला विश्वास आहे. विनेश तू नेहमीच देशाचा अभिमान वाढवला आहेस. आजही संपूर्ण देश तुझी ताकद म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
100 ग्रॅम वजनामुळे विनेश फोगटचे पदक हुकले
बुधवारी (7 ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत 50 किलो वजनी गटात विनेश फोगटचा सामना अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी होता. पण, सामन्यापूर्वी विनेशचे 100 ग्राम वजन जास्त आल्याने तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले. अपात्रतेमुळे तिला आता कोणतेही पदक मिळणार नाही.
विनेशसाठी ऑलिम्पिक स्पर्धा खूपच निराशाजनक ठरली आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला दुखापतीमुळे सहभागी होता आले नाही. त्यानंतर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. यंदा ती पदक जिंकण्याची आशा होती, पण तांत्रिक अडचणींमुळे तिला बाहेर काढण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 07-08-2024
What's Your Reaction?