रत्नागिरी : गोदूताई जांभेकर विद्यालयाचा शतकमहोत्सव कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण

Aug 10, 2024 - 10:46
 0
रत्नागिरी : गोदूताई जांभेकर विद्यालयाचा शतकमहोत्सव कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाचे यंदा शतकमहोत्सवी वर्ष सुरू आहे. यातील एक कार्यक्रम जानेवारीत होणार असून, त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांनी संस्थेच्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट संस्थेचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुद्गीकर यांनी घेतली. त्या वेळी त्यांना निमंत्रण देण्यात आले. शतकमहोत्सव कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहावे यासाठी निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांनी निमंत्रण स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळा, महाविद्यालयात शहरी व ग्रामीण भागांतील सुमारे १५ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. 

स्त्री शिक्षणामध्ये आमूलाग्र क्रांती करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन (कै.) बाबूराव जोशी व (कै.) मालतीबाई जोशी या दाम्पत्याने अवघ्या तीन मुलींना घेऊन सौ. गोदूताई जांभेकर महिला विद्यालयाची स्थापना केली. 

भौगोलिकदृष्ट्या मागासलेल्या कोकण विभागात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. १९२५ ला रोवलेल्या रोपट्याचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वर्षी जांभेकर महिला विद्यालयाचे शतकमहोत्सवी वर्ष आहे. सन १९२५ ते १९६७ अशा प्रदीर्घ काळामध्ये (कै.) मालतीबाई जोशी यांनी मुख्याध्यापिका म्हणून काम करून हे विद्यालय नावारूपाला आणले. फळाची आशा न बाळगता मालतीबाई कार्य करत राहिल्या. त्यांच्या या निरलस स्त्रीशिक्षण कार्याचा गौरव तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांनी त्यांना १९६४ ला 'राष्ट्रपती पुरस्कार' देऊन केला. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या शतकमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow