रत्नागिरीतील नवीन भाजी मार्केटचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश

Aug 10, 2024 - 10:59
 0
रत्नागिरीतील नवीन भाजी मार्केटचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे  आदेश

रत्नागिरी : शहरातील नवीन भाजी मार्केट इमारतीतील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या मागणीनुसार महावितरणने या धोकादायक इमारतीतील वीजपुरवठा खंडित केला होता. सुमारे दोन आठवडे मार्केट इमारतीत वीजपुरवठा सुरू नव्हता.

रत्नागिरी नगर परिषद मालकीची नवीन भाजी मार्केटची इमारत फारच जीर्ण झाली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही इमारत धोकादायक झाल्याने इमारतीतील गाळेधारकांनी गाळे रनपच्या ताब्यात देण्याची नोटीस बजावली. या नोटीस बिरुद्ध गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेऊन नोटीसला स्थगिती आणि रनपकडून वहिवाटीस अडथळा होवू नये, असे आदेश होण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली.

मुसळधार पावसामुळे इमारतीला धोका असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव या इमारतीचा वीजपुरवठा महावितरणकडून गेल्या महिन्यात खंडित करून घेतला. हा वीजपुरवठा सुरू व्हावा, यासाठी पुन्हा गाळेधारकांनी २५ जुलै रोजी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला.

भाजी मार्केट इमारत फारच धोकादायक झाली आहे. सर्व बाजूने पाणी गळत असल्याने शॉर्ट सर्कीट किंवा विजेच्या झटक्याने दुर्घटना होण्याची भीती आहे. त्यामुळेच वीजपुरवठा खंडित केला असल्याचे रनपचे वकील अॅड, निलांजन नाचणकर यांनी न्यायालयाला सांगितले, जिवीत किंवा वित्त हानीसंदर्भात गाळेधारकांकडून हमीपत्र मिळाल्यास रनपची काहीही हरकत नसल्याचेही वकिलांनी स्पष्ट केले.

गाळेधारकांकडून त्याप्रमाणे हमीपत्र देण्यात आले. या हमीपत्रानुसार संभाव्य हानी किंवा नुकसानीची जबाबदारी गाळेधारकांनी सुनावणीवेळी घेतली होती. ११ जुलै रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. न्यायालयाने याप्रकरणी नुकताच आदेश दिला आहे. या आदेशानुसार नवीन भाजी मार्केट इमारतीतील वीजपुरवठा पूर्ववत करून द्यायचा आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात गाळेधारक आणि रत्नागिरी नगर परिषदेने केलेल्या पूर्ततचा अहवाल देण्याचेही आदेशात म्हटले आहे.

अनेकांनी गाळे दिलेत रनपच्या ताब्यात
नवीन भाजी मार्केटची इमारत धोकादायक झाल्याने गाळे रनपच्या ताब्यात देण्याची नोटीस बजावण्यात आली. अनेक गाळेधारकांनी आपापले गाळे रनपच्या ताब्यात दिले आहेत. परंतु, काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने त्यांचे व्यवसाय गाळ्यांमध्ये सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow