राज्यातील शिक्षक समन्वय संघातर्फे १६ पासून हुंकार आंदोलन

Aug 13, 2024 - 10:40
 0
राज्यातील शिक्षक समन्वय संघातर्फे १६ पासून हुंकार आंदोलन

माखजन : महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या टप्पा वाढीचा प्रश्न निकाली निकाली निघालेला नाही. यामुळे शिक्षक समन्वय संघातर्फे १६ ऑगस्टपासून आझाद मैदान येथे वेतन अनुदानाच्या टप्पा वाढीचा निर्णय होईपर्यंत शासनाविरोधात हुंकार आंदोलन केले जाणार आहे.

अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय १५ नोव्हेंबर २०११ व ४ जून २०१४ मधील तरतुदीनुसार १ जानेवारी २०२४ पासून प्रतिवर्षी नैसर्गिक वाढीने टप्पा अनुदान देणे, शासनाच्या चुकीमुळे शासन निर्णय १२, १५ व २४ रोजीच्या नमूद केलेल्या ३० दिवसांच्या आत शासनस्तरावर त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, तुकड्यांना समान टप्प्यावर आणणे, राज्यातील पुणे स्तरावर अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून वेतन अनुदान मंजूर करणे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर केले जाणार आहे.

राज्यात काही प्राथमिक शाळा २०,४०, ६० टक्के अनुदानावर आहेत तर काही माध्यमिक शाळा २०, ४०, ६० टक्के अनुदान घेत आहेत. अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळा काही २० तर काही ४० टक्के वेतन अनुदान घेत आहेत. या सर्वच शाळा १५ नोव्हेंबर २०११ व ४ जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार १०० टक्के वेतन अनुदानाच्या दावेदार आहेत. असे असताना राज्य शासनाकडून शिक्षकांचं शोषण केले जात असल्याचे विदारक चित्र सध्या समोर येत आहे.

वेतन अनुदानात टप्पा वाढची घोषणा
वेतन अनुदानात जून २०१४ पासून टप्पा वाढ दिला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लक्षवेधीला उत्तर देताना अधिवेशनात केली होती. अधिवेशन संपून महिना झाला, अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या तरी या मुद्द्यावर शासनाने काहीच निर्णय घेऊन शासन निर्णय न केल्याने आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow