रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ताफ्यात ४ आधुनिक पर्यटन बस

Aug 13, 2024 - 11:02
 0
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ताफ्यात ४ आधुनिक पर्यटन बस

रत्नागिरी : पर्यटन वाढीसाठी सिंधुरत्न विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषदेने ४ आधुनिक पर्यटन बस त्याचबरोबर ५ हाऊसबोट घेतल्या आहेत. यापैकी पर्यटन बस जि.प.मध्ये दाखल झाल्या आहेत. तर हाऊसबोट २ दिवसात दाखल होतील, असे सांगण्यात येत आहे. या सर्वांचा लोकार्पण सोहळा पुढच्या आठवड्यात होणार आहे. या सर्व बस व बोट महिला बचत गटांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

केरळ प्रमाणे हाऊस बोटिंग आणि अलिशान बसचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. सिंधुरत्न योजनेतून या प्रकल्पाला निधी मंजूर झाला आहे. त्यातून अलिशान चार बस खरेदी करण्यात आल्या आहेत. एक बस साधारण २८ लाखांच्या दरम्यान आहे. सतरा आसनी या गाड्या आहेत. एसी, चाजींग पॉइंडसर करमणुकीची साधने त्यामध्ये आहेत. रत्नागिरी, संगमेश्वर दर्शनासह अन्य ठिकाणी या बस जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा ठेवण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्याला २, संगमेश्वर १ आणि दापोली तालुक्याला १ बस दिली जाणार आहे.

हाऊसबोटीचा ५ कोटींचा हा प्रकल्प आहे. एक बोट १ कोटीची आहे, अशा ५ बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत. अलिशान आणि आकर्षक अशा त्या बोटी आहेत. त्यामध्ये २ बेडरुम, एसी, नाष्ता, जेवण आदींची सुविधा आहे. जयगड ते दाभोळ असा खाडी जलमार्ग त्यासाठी निश्चित केला आहे. 

चिपळुण येथे मगर सफरचाही यात विचार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी जिल्हा परिषद मुख्याधिकारी कीर्तिकीरण पूजार यांनी पुढाकार घेतला. येथील ४ पर्यटन बस जि.प.मध्ये दाखल झाल्या आहेत. तर हाऊसबोट २ दिवसात येतील, असे सांगण्यात येत आहे. याचा लोकार्पण सोहळा १५ ऑगस्टला करण्याचा विचार होता. परंतु २१ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

महिला होणार स्वावलंबी
दोन्ही प्रकल्प महिला बचत गटांच्या प्रभाग संघाला दिल्या जाणार आहे. एका प्रभाग संघामध्ये सुमारे ५० बचत गट असतात. या गटांना वेगवेगळे पॅकेज दिले जाणार आहे. कोणाकडे जेवणाची व्यवस्था, बोट पार्किंग-देखभालचे पॅकेज अशी छोटी-छोटी पॅकेज तयार करून बचत गटाच्या महिलांना स्वावलंबी केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow