राजापूर : शाळा, आरोग्यकेंद्र, ग्रामपंचायत, अंगणवाड्यामध्ये 'रेन हार्वेस्टिंग' प्रकल्प

Aug 14, 2024 - 13:46
 0
राजापूर :  शाळा, आरोग्यकेंद्र, ग्रामपंचायत,  अंगणवाड्यामध्ये  'रेन हार्वेस्टिंग' प्रकल्प

राजापूर : केंद्र शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत विविध विकासकामे करताना त्या द्वारे कुशल अकुशल लोकांना गावामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचवेळी आता शासकीय कार्यालयांसह शाळांच्या इमारतीच्या छत्तावरील पावसाचे पाणी संकलन करणारा रेन हार्वेस्टिंग' प्रकल्प तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे. प्रस्ताव आलेल्या ५३ शाळा, ५ आरोग्यकेंद्र, २० ग्रामपंचायत, १२ अंगणवाड्या अशा ९० कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १३ कामे पूर्ण झाल्याची माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली.

कुशल आणि अकुशल लोकांना गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संबंधित कामगाराला शासनाकडून किमान वेतन दिले जाते. या योजनेतून गावामध्ये विविध विकासकामे करताना आता छत्तावरील पाणी संकलन करणारा रेन हार्वेस्टिंग प्रकल्प' राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली गट‌विकास अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर लोकांना गावामध्ये रोजगार मिळताना भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याला मदत होणार आहे. या प्रकल्पांतर्गत ९० कामांना पंचायत समितीकडून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यापैकी डोंगर, कळसवली, कोळवणखडी, सोलगाव, तळवडे, येळवण या ग्रामपंचायतीतर्गत असलेली १३ कामे पूर्ण झाली आहेत.

भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रेन हार्वेस्टिंग प्रकल्पामध्ये पावसाचे इमारतीच्या छतावर पडणारे पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून जमिनीमध्ये सोडून त्या ठिकाणी ते जिरवले जाणार आहे. त्याच्या साहाय्याने त्या परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी (विशेषतः त्या परिसरातील विहिरी वा तळी वाढण्याला एकप्रकारे मदत होणार आहे

'रेन हार्वेस्टिंग'साठी निवड झालेल्या शाळा
कोंडोतर्फ सौदळ शाळा नं. १, मूर नं. ४, ताम्हाणे नं. ३, २, डोंगर नं. २, पडवे नं. १, २, दोनिवडे नं. १, खरवते नं. २, प्रिंदावण-बांदीवडे, ओणी नं. ३, जांभवली, कोंडसर बुद्रुक, जवळेथर केंद्रशाळा, वाडीखुर्द, वडदहसोळ नं. १, रूंढे, वाडापेठ, परूळे नं. ३, कोदवली- मांडवकरवाडी नं. २, मिठगवाणे नं. १, मिठगवाणे नं. ३, दसूर नं. १, जानशी, सौंदळ, ओणी शाळा दैतवाडी, लिंगायतवाडी, तेलीवाडी, ओणी नं. १, कोंडवाडी नं. ४, गोवळ नं. २, ३, १, कळसवली नं. ३, १ आणि ४, कोळंब, दळे नं. १, चिखलगाव, खिणगिणी, शेडे, तळगाव, तुळसवडे, तुळसवडे नं. २, आंबोळगड, सोलगाव शाळा १, २ आणि ३, मंदरूळ-१ आणि २, देवीहसोळ-१, २, ३. आरोग्य केंद्र पेंडखळे, गोवळ, पाचल, डोंगर, देवीहसोळ ग्रामपंचायती : आंबोळगड, सोलगाव, देवीहसोळ, देवाचेगोठणे, कोदवली, मिठगवाणे, केळवली, दसूर, निवेली, सौदळ, ओणी, ताम्हाणे, गोवळ, तळवडे, झयें, कोळवणखडी, पन्हळेतर्फ सौंदळ, पेंडखळे, हातिवले, कुवेशी, अंगणवाड्या केळवली, बाकाळे, जानशी, ताम्हाणे, गोवळ वरचीवाडी, खालचीवाडी, कळसवली तरळवाडी, ओमटेवाडी, शेडेकरवाडी, आंबोळगड, सोलगाव ४, देवीहसोळ.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow