खेड : पीरलोटे परिसरात सर्व्हिस रोडची चाळण

Aug 14, 2024 - 14:16
 0
खेड : पीरलोटे परिसरात सर्व्हिस रोडची चाळण

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील पीरलोटे येथील अंडरपास शेजारील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड नामशेष झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना दररोज अनेक छोट्या-मोठ्या अपघातांचा सामना करावा लागत आहे.

तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमुळे लगतच्या गावांपैकी पीरलोटे हे सातत्याने गजबजलेले ठिकाण आहे. औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांच्या कामगार वसाहती व स्थानिकांसह परगावातील नागरिकांची निवासी वसाहत याच ठिकाणी आहेत. त्याचबरोबर महामार्गावरील परशुराम घाटाला पर्यायी मार्ग म्हणूनही या मार्गाचा अनेकदा वापर केला जातो. याच मार्गावरून पश्चिमकडे सोनगाव, धामणदिवी तर पूर्वेकडे चिरणी, आंबडस, कळंबस्तेमार्गे चिपळूण असा मार्ग आहे. पीरलोटे हे महामार्गावरील बसथांबा असल्यामुळे कामगार, विद्यार्थी, प्रवासी व रुग्ण याच मार्गाने ये-जा करतात; मात्र सद्यः स्थितीत पाहता या सर्व्हिस रोडची चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आजुबाजूच्या ग्रामपंचायती, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. किमान गणपतीपूर्वी तरी या रस्त्यावरील खड्डे बुजवून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow